संगमनेरच्या पठार भागात आठ लाख रुपयांचा गुटखा पकडला !
स्थानिक गुन्हे शाखा नगरची कारवाई
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; पाच आरोपींना अटक
२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी —
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथे मोठी कारवाई करत ८ लाख १० हजार रुपयांच्या गुटख्यासह तब्बल २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मध्यरात्री शनिवारी सुमारास करण्यात आली. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीला बंदी असतानाही पठार भागातील कुरकुटवाडी येथे गुटख्याची विक्री करण्यासाठी बोटा ब्राह्मणवाडा मार्गे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

अविनाश आण्णा कमलाकर, पिकअप चालक प्रमोद सदाशिव मोरे (दोघे राहणार रुई, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर), ईको गाडी चालक संदीप गोरक्षनाथ शिंगवान (रा. धामणगांव, ता. अकोले), सागर रमेश नाईकवाडे (रा. धामणगांव, ता. अकोले), संदीप शिवाजी वाळुंज (रा. धामणगांव), या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रकाश आनंदराव पाटील (रा. कोल्हापुर नाका, इचलकरंजी), शुभम चेंडके (रा. शिवणकवाडी, ता. शिराळ, जि. कोल्हापुर), सनि उर्फ सनिल रमेश नाईकवाडे (रा. धामणगांव, ता. अकोले) हे तिघेजण फरार झाले आहेत. एकूण या आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुरकुटवाडी शिवारात ब्राह्मणवाडा गावाकडून येणारी इको व्हॅन रस्त्यावर महिंद्रा पिकप शेजारी येऊन थांबली. कडेला रस्त्यावर काहीजण बेकायदेशीर रित्या गुटख्याची विक्री करण्याच्या तयारीत होते. पोलिसांना या ठिकाणी महिंद्रा कंपनीची पांढर्या रंगाची पिकअप गाडी नंबर एम. एच. 10 सी. आर. 9762, सुझुकी कंपनीची पांढरे रंगाची ईको गाडी क्रमांक एम. एच. 01 डी. ई. 7966 ही दोन वाहने आढळून आली. पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून ६ लाख रुपये किमतीच्या हिरा पानमसाल्याचे एकुण ४० गोण्या जप्त केल्या. तर दुसऱ्या गाड्यातून २ लाख १० हजार रुपयांच्या १४ गोण्या जप्त केल्या.

गुटखा प्रतिबंध घातलेल्या सुगंधीत पान मसाला यासह दोन वाहने आणि वाहनातील इतर इलेक्ट्रॉनिक सामान मोबाईल यासह पोलिसांनी एकूण २४ लाख २९ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस नाईक विजय ठोंबरे, संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, रोहित मिसाळ व शिवाजी ढाकणे या पथकाने ही कारवाई केली आहे

याबाबत पोलीस नाईक संतोष खैरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करत आहेत.

