फुटवेअरच्या दुकानातून सुरू होती गांजा विक्री ! एलसीबीचा छापा, एकास अटक ; २ किलो १६७ ग्रॅम गांजा जप्त

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

साई सेवा फुटवेअर दुकानातून गांजाची विक्री होत असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सागर अविनाश बोराडे (वय ३४, रा. लोहार गल्ली, श्रीगोंदा) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून २ किलो १६७ ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

एलसीबी चे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, सागर अविनाश बोराडे हा गोदडे महाराज मठाजवळील साई सेवा फुटवेअर दुकानातून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीचा लेखी अहवाल श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांना देण्यात आला.

त्यानंतर कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार शोभा कुरुळे यांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित दुकानाची तपासणी केली.

या तपासणीदरम्यान दुकानातील एका कापडी पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी सागर बोराडे याला ताब्यात घेतले आणि गांजासह मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत २ किलो १६७ ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची किंमत १ लाख ८ हजार ३५० रुपये आहे, तसेच ५० रुपये किमतीची एक कापडी पिशवी, असा एकूण १ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेल्या गांजाबाबत पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, हा गांजा जामखेड तालुक्यातील चौंडी येथील अक्षय नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव समजू शकले नसून, तो फरार असल्याचे प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२३/२०२६ नुसार अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(क) आणि २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!