संगमनेरमध्ये चोरट्यांचे आक्रमण ; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह !

अवघ्या २४ तासांत प्रवाशांचे २ लाख ३७ हजारांचे दागिने व रोकड लंपास

संगमनेर (प्रतिनिधी) : 

संगमनेर शहर आणि तालुका परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अवघ्या २४ तासांच्या अंतराने घडलेल्या चोरीच्या दोन घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि गस्तीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बसस्थानक आणि प्रवासी बसमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत प्रवाशांचा एकूण २ लाख ३७ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

वर्दळीच्या ठिकाणी आणि प्रवासी वाहतुकीदरम्यान चोरट्यांची हिंमत वाढल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६:१५ वाजण्याच्या सुमारास संगमनेर बसस्थानक परिसरात प्रवाशाकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास संगमनेरकडून आश्वीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासादरम्यान चोरीची घटना घडली. पिंपरणे (ता. संगमनेर) परिसरात प्रवाशाने तिकीट काढण्यासाठी पर्स उघडली असता, अज्ञात चोरट्याने संधी साधत पर्सची चैन उघडून आतील सोन्याचे दागिने ठेवलेले पाकीट लंपास केले. या चोरीत १ लाख २ हजार ६०० रुपयांचे दागिने गेले असून, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सलग दोन दिवस प्रवाशांना लक्ष्य केले जात असतानाही पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई कुचकामी ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दोन्ही प्रकरणांतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता शहर व तालुका पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!