कर्नाटकातून अहिल्यानगर जिल्ह्यात गुटख्याची तस्करी ; एलसीबीचा छापा !

आयशर टेम्पोसह तब्बल २८ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

कर्नाटकातून विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या प्रतिबंधित सम्राट पानमसाला गुटख्याच्या तस्करीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जातेगाव फाटा येथे सापळा रचून आयशर टेम्पो अडविण्यात आला. या कारवाईत सम्राट पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि आयशर टेम्पोसह एकूण २८ लाख ४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर गुटखा पुरवठा करणारे कर्नाटकातील दोन आरोपी फरार आहेत.

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, खर्डा येथून जामखेडच्या दिशेने आयशर टेम्पो क्रमांक एमएच-१०-डीटी-०२६७ मधून गुटखा विक्रीसाठी नेण्यात येणार आहे.

या माहितीच्या आधारे पथकाने खर्डा ते जामखेड रस्त्यावरील जातेगाव फाटा येथे सापळा रचला. यावेळी संशयित आयशर टेम्पो आढळून आल्याने पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली. वाहनामध्ये सुगंधित तंबाखू आणि पानमसाला गुटखा आढळून आला.

या प्रकरणी १) साबीर कौसर शेख (वय २४, रा. शेकापूर, ता. भूम, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील पुढीलप्रमाणे :

* ११ लाख ८८ हजार रुपये किमतीचा सम्राट पानमसाला.

* १ लाख १६ हजार १६० रुपये किमतीची सुगंधित तंबाखू.

* १५ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो (क्रमांक एमएच-१०-डीटी-०२६७).

असा एकूण २८ लाख ४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत ताब्यातील आरोपीकडे चौकशी केली असता, हा माल सम्राट पानमसाला गुटखा कंपनीच्या मालकांचा असून विक्रीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती त्याने दिली. यामध्ये २) संतोष चंद्रप्पा (पूर्ण नाव माहीत नाही, रा. उदगीर रोड, हनुमान मंदिर, नऊबद, जि. बिदर, कर्नाटक) आणि ३) रविंद्र शरणप्पा (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बापुर, जि. बिदर, कर्नाटक) यांचा समावेश असून, हे दोघेही सध्या फरार आहेत.

ताब्यातील आरोपीला जप्त मुद्देमालासह खर्डा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्याच्याविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८२/२०२६, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!