दुष्काळाच्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
संगमने टाइम्स न्यूज नेटवर्क –
दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये. राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी येथे पालकमंत्री डॉ. विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळीचा फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील इतर कुटुंबांनाही फराळ आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन
दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी चारा उत्पादन करावे, यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नियोजन सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पाणीटंचाईवर उपाययोजनांचे निर्देश
सध्या आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी मिळावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आगामी आठ ते नऊ महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
ग्रामस्थांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही
यावेळी ग्रामस्थांनी रेशनधान्य, संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बंधाऱ्यांचे खोलीकरण आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता आदी प्रश्न मांडले. या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दुष्काळग्रस्त शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी राजेंद्र धस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
![]()






