दीपावली आनंद, प्रकाश आणि बंधुभावाचे पर्व – बाळासाहेब थोरात

अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन उत्साहात

संगमनेर (प्रतिनिधी) : 

दीपावली हा आनंद, प्रकाश, प्रेम आणि बंधुभावाचा सण आहे. संगमनेर तालुक्याची प्रगती अनेक पिढ्यांच्या कष्टातून आणि सहकाराच्या बळावर झाली असून, ही विकासाची परंपरा जपली पाहिजे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत लक्ष्मीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमृतवाहिनी बँक, राजहंस दूध संघ, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या विविध संस्थांमध्येही लक्ष्मीपूजन करण्यात आले.

थोरात म्हणाले की, दुष्काळी तालुक्यापासून प्रगतशील तालुक्यापर्यंतची संगमनेरची वाटचाल शेतकरी, कामगार आणि सहकार क्षेत्रातील योगदानातून घडली आहे. निळवंडे धरण व कालवे पूर्ण झाल्याने यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा झाला असला, तरी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, या संकटातून सावरण्याची शक्ती सर्वांना मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांनी शेतकरी, उत्पादक आणि कामगारांना विविध देयके दिल्याने बाजारपेठेत आर्थिक चैतन्य निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी कारखान्याच्या कामकाजाची माहिती दिली. कारखान्याच्या ९ हजार मे. टन क्षमतेच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून, चालू हंगामात ८५ लाख युनिट वीज वितरित करण्यात आली आहे. तसेच शेतकरी सभासद आणि कामगारांना दिवाळीनिमित्त सुमारे २२ कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, डॉ. जयश्री थोरात, कांचनताई थोरात यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अमोल दिघे यांनी मानले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!