डीजे बंद करून सोमेश्वर मंडळाने महाराष्ट्रापुढे आदर्श ठेवला – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेरच्या मानाच्या सोमेश्वर गणेश मंडळाने सांस्कृतिक परंपरा जपत यंदाही डीजे आणि गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक काढली. पारंपरिक वाद्यांचा गजर, लाठीकाठी व शिवकालीन खेळांच्या प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीला पारंपरिक संस्कृतीची रंगत लाभली.

रंगार गल्ली येथील मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना थोरात यांनी, “महाराष्ट्रात डीजे बंदीची चर्चा आता होत असताना सोमेश्वर मंडळाने २००२ मध्येच 25 वर्षांपासून डीजे आणि गुलालाला फाटा दिला. शिस्त, शांतता आणि पारंपरिक संस्कृतीची ही परंपरा महाराष्ट्रासाठी आदर्श आहे,” असे सांगितले.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत थोरात यांनी गणरायाच्या चरणी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडून शेतकरी आणि नागरिक सुखी-समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना केली.

आमदार सत्यजित तांबे यांनी सोमेश्वर मंडळाच्या ऐतिहासिक परंपरेचे कौतुक केले. शांतता आणि उत्साहात संगमनेरचा गणेशोत्सव पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनीही गणेशोत्सवातील नागरिकांच्या सहभागाचे कौतुक केले. सोमेश्वर मंडळाने यंदा सादर केलेल्या जगन्नाथ पुरीच्या देखाव्याला गणेशभक्तांचा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मिरवणुकीत लाठीकाठी, मैदानी खेळ आणि शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीत नागरिक, महिला, युवक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, मंडळाचे अध्यक्ष रोशन आमले, कार्याध्यक्ष अभिजीत पाटणकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!