गरिबांच्या दिवाळीत गोडवा ; आमदार अमोल खताळांचा आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात !

संगमनेर / प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यात यंदा दुष्काळाचे गंभीर संकट निर्माण झाले असून, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार आणि आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून आमदार अमोल खताळ यांनी आदिवासी व गरजू कुटुंबांना दिवाळीचा आनंद दिला. कर्जुले पठार येथील येठेवाडी, गुंजाळवाडी पठार येथील काटवणवाडी तसेच डोळासणे येथील दुबेवाडी परिसरात दिवाळी शिधा, साड्या, मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वंचित आणि गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, महायुती सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शासनाच्या मदतीसोबतच समाजातील प्रत्येक घटकानेही गरजू कुटुंबांना सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केल्यास संकटग्रस्त कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो.

दुष्काळाची तीव्रता डिसेंबर-जानेवारीनंतर अधिक जाणवण्याची शक्यता असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज भासेल, तेथे शासनाच्या माध्यमातून टँकर सुरू केले जातील. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीनेही गरजेनुसार खासगी टँकर सुरू करून दुष्काळग्रस्त गावांना मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, कर्जुले पठारचे सरपंच किरण भागवत, माजी सरपंच रवींद्र भोर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, येठेवाडी, काटवणवाडी आणि दुबेवाडी या वाड्या-वस्त्यांवर विज सुविधा उपलब्ध झाली नव्हती. तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर या भागातील वीजपुरवठ्यासाठी आवश्यक विद्युत रोहित्रे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ही रोहित्रे तातडीने कार्यान्वित करून वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच या वस्त्यांमधील अंधार दूर होऊन नागरिकांच्या जीवनात प्रकाश निर्माण होईल, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!