शरद पवारांची बाळासाहेब थोरातांकडून रुग्णालयात जाऊन आस्थेवाईक विचारपूस ; लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होण्याच्या दिल्या शुभेच्छा!
संगमनेर प्रतिनिधी :
ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्र पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी थोरात यांनी पवार यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांना लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जनसेवेच्या कार्यात सक्रिय व्हावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
खासदार शरद पवार हे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्येही त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी आणि आपुलकीची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी काल नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीत सहभाग घेतला. बैठक संपल्यानंतर त्यांनी मुंबई गाठत आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली आणि लवकर प्रकृती सुधारावी, यासाठी शुभेच्छा दिल्या.
शरद पवार यांचे देशाच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात मोठे योगदान आहे. विशेषतः शेती, सहकार, ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी दीर्घकाळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा आणि अनुभवाचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सक्रिय व्हावे, अशी भावना थोरात यांनी व्यक्त केली.
दिवाळीच्या शुभपर्वावर राज्यातील शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पवार यांचे मार्गदर्शन यापुढेही लाभत राहावे, अशी अपेक्षाही थोरात यांनी व्यक्त केली. पवार यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशा सदिच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

![]()





