जोर्वेत अवैध वाळू उपशाचा धुमाकूळ !
प्रवरा नदीचे पात्र जेसीबी-पोकलेनने पोखरले ; सार्वजनिक विहिरींनाही धोका
उपोषणासह तीव्र आंदोलनाचा इशारा
संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील जोर्वे परिसरात प्रवरा नदीच्या पात्रातून कथितपणे अहोरात्र सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने नदीचे पात्र अक्षरशः पोखरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या अवैध व्यवसायामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, पाणीपुरवठ्याला धोका आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अवैध वाळू उपसा बंद करावा आणि त्यामागील संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी जोर्वे ग्रामस्थांनी केली आहे.

यासंदर्भात प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे आणि पोलीस निरीक्षक यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. वारंवार सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवितासह सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
सार्वजनिक विहिरींच्या अस्तित्वालाच धोका !
ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केल्यानुसार, प्रवरा नदीच्या पात्रात बेसुमार वाळू उपसा केल्यामुळे परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरींच्या जवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या विहिरींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. विहिरींच्या पाण्याच्या प्रदूषणाबाबतही ग्रामस्थांनी गंभीर चिंता व्यक्त केली असून, विहिरींमध्ये दारूच्या बाटल्या आढळून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाळू उपशाच्या आड दहशत आणि अवैध धंदे फोफावल्याचा आरोप !
वाळू उपशाच्या व्यवसायाला स्थानिक पातळीवर राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे वाळू तस्करांचे धाडस वाढले असून, परिसरात दादागिरी आणि दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय अवैध वाळू उपशाबरोबरच अवैध दारू विक्रीचे प्रमाणही वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवरही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या अवैध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, आर्थिक हितसंबंधांमुळे कारवाई टाळली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

नदीचे पात्र उद्ध्वस्त ; पर्यावरणाचा समतोल धोक्यात !
जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले जात असल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे. नदीपात्राची नैसर्गिक रचना बदलण्याबरोबरच भूजलसाठ्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. एका बाजूला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना दुसऱ्या बाजूला नदीपात्राची लूट सुरू असल्याने ग्रामस्थांचा संताप वाढत आहे.
कारवाई करा, अन्यथा उपोषणाचा मार्ग !
यावेळी बोलताना शरद नाना थोरात यांनी सांगितले की, बेसुमार वाळू उपशामुळे केवळ पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही, तर परिसरातील सामाजिक संतुलनही बिघडत आहे. अवैध दारू विक्री आणि इतर गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळत असून, सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने वाळू उपसा बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी; अन्यथा ग्रामस्थांना उपोषणासह तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या निवेदनावर शरद नाना थोरात, विठ्ठल काकड, अनिल बाळासाहेब दिघे, संजय निवृत्ती थोरात, बादशहा बोरकर, पी. वाय. दिघे, दिगंबर इंगळे, प्रमोद इंगळे, भाऊसाहेब दिघे, राजू थोरात, धनंजय दिघे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आता प्रशासन कोणाची बाजू घेणार? नदीपात्राची लूट थांबवून ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करणार की तक्रारींची दखल घेण्यासाठी आणखी एखाद्या आंदोलनाची वाट पाहणार, असा थेट सवाल जोर्वे ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
![]()



