संगमनेर राजहंस दूध संघातर्फे दिवाळी गोड ! 

दूध उत्पादक व कामगारांच्या खात्यात ५० कोटी रुपये वर्ग

संगमनेर प्रतिनिधी :

माजी महसूल बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाने आर्थिक स्थिरता निर्माण केली आहे. या यशस्वी वाटचालीचा भाग म्हणून, दीपावलीच्या पवित्र सणानिमित्त राजहंस दूध संघातर्फे सुमारे ५० कोटी रुपयांची विविध देयके थेट बँकेत वर्ग करण्यात आली आहेत. दूध संघाचे माजी चेअरमन व जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत रक्कम, कामगारांचा बोनस व मेहनताना, तसेच चढ-उतार निधी इत्यादी बाबींसाठी ही मोठी रक्कम अदा करण्यात आली आहे. संगमनेर दूध संघाची वार्षिक उलाढाल ६०९ कोटी रुपये असून, दूध उत्पादकांना वर्षभरात केवळ दूध खरेदीपोटी सुमारे ५०० कोटी रुपये दिले जातात.

दर १५ दिवसांनी नियमितपणे दूध पेमेंट होत असल्यामुळे दूध उत्पादकांचे अर्थकारण शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असते. दुग्धव्यवसायात क्रांती घडवून आणण्यासाठी ५० लिटर दुधाच्या गाई निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला बळ

दिवाळीच्या निमित्ताने ग्रामीण भागात येणाऱ्या या कोट्यवधी रुपयांमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत आहे. ग्रामीण भागातील हे अर्थकारण थेट शहराशी जोडलेले असल्याने, दूध उत्पादकांकडील रक्कम खरेदीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांकडे जाते. यामुळे संगमनेरची बाजारपेठ आज जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ बनली असून, तालुक्यातील शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्ग यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची व पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली असून, दूध उत्पादकांनी चाऱ्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अडचणीच्या काळात संघाने नेहमीच मदत केली असून शासनानेही तात्काळ दुष्काळाचे नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सहकारी चळवळ अधिक बळकट करण्यासाठी दूध उत्पादकांनी संघास ताजे, स्वच्छ व निर्भेळ दूध पुरवावे आणि ग्राहकांनी देखील ‘राजहंस’चे दर्जेदार व शुद्ध दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावेत, असे आवाहन व्हा. चेअरमन राजेंद्र पाटील चकोर यांनी केले आहे.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!