आनंदवन विद्यालयात मुलींसाठी आरोग्यजागृतीचा उपक्रम ; 

किशोरवयीन आरोग्यापासून सायबर सुरक्षेपर्यंत प्रा. दीप्ती सातपुते यांचे मार्गदर्शन

संगमनेर प्रतिनिधी : 

किशोरवय हा मुलींच्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या काळात योग्य माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सकारात्मक मार्गदर्शन मिळाल्यास मुली आत्मविश्वासाने जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. मुलींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत स्वाभिमान, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन प्राध्यापिका दीप्ती सातपुते यांनी केले.

संगमनेर येथील विद्या प्रबोधिनी संस्थेच्या आनंदवन विद्यालयात विद्यार्थिनींसाठी आयोजित विशेष आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा फटांगरे, कृष्णामाई खैरनार, कल्पना सातव, मीना खर्डे आणि निर्मला आहेर आदी शिक्षिका उपस्थित होत्या.

या व्याख्यानात प्रा. सातपुते यांनी विद्यार्थिनींना किशोरवयातील शारीरिक व भावनिक बदल, हार्मोनल बदल, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी आणि त्यासंबंधीचे सामाजिक गैरसमज याबाबत शास्त्रीय माहिती दिली. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, संतुलित आहार, लोहयुक्त पदार्थांचे सेवन, हिमोग्लोबिनची कमतरता आणि रक्तक्षय टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचा शारीरिक व मानसिक विकासाशी असलेला संबंधही त्यांनी विशद केला.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी गुड टच-बॅड टच, वैयक्तिक सीमांची जाणीव, अनुचित वर्तनाला निर्भयपणे विरोध करणे आणि अडचणीच्या प्रसंगी विश्वासू व्यक्तीची मदत घेणे याबाबत सविस्तर माहिती दिली. स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे हा प्रत्येक मुलीचा अधिकार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डिजिटल युगातील आव्हानांवर भाष्य करताना मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडियाचे आकर्षण, सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि सायबर बुलिंग यांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मोबाईलचा वापर ज्ञान, शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी करावा; मात्र त्याचे व्यसन होऊ देऊ नये, असा संदेश त्यांनी दिला.

मानसिक आरोग्याविषयी बोलताना तणाव, भीती, न्यूनगंड, नैराश्य, भावनिक चढ-उतार आणि इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती यांवर त्यांनी प्रकाश टाकला. स्वतःला कमी न लेखता स्वतःच्या क्षमतांची ओळख निर्माण करणे, अपयशातून शिकणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि मनातील अडचणी विश्वासू व्यक्तीसमोर मोकळेपणाने व्यक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय मैत्री, नातेसंबंध, योग्य-अयोग्य निर्णयक्षमता, संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, ध्येय निश्चिती आणि शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक स्वावलंबन साधण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना पटवून दिले. स्त्री-पुरुष समानता, स्वतःच्या हक्कांची जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आणि अंधश्रद्धा व सामाजिक गैरसमजांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘आपण मुलगी आहोत, असा न्यूनगंड न बाळगता आत्मभान आणि स्वाभिमानाची भावना जोपासली पाहिजे. मुलींनी केवळ निर्भय नव्हे, तर सक्षम, स्वावलंबी, सजग आणि कर्तृत्ववान बनावे,’ असा प्रेरणादायी संदेश प्रा. सातपुते यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शैलजा फटांगरे यांनी केले. प्रा. सातपुते यांचा परिचय कल्पना सातव यांनी करून दिला. सूत्रसंचालन कृष्णामाई खैरनार यांनी केले, तर आभार मीना खर्डे यांनी मानले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!