“कलेला व्यासपीठ, कौशल्याला दिशा ; जयहिंदच्या महोत्सवात १२ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग !”

कला-कौशल्यातून करिअरच्या नव्या संधी – मीाजी मीांत्री बाळासाहेब थोरात 

संगमनेर प्रतिनिधी : 

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कला महोत्सव कौतुकास्पद असून, हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आयोजित दोन दिवसीय कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

१२ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

जयहिंद लोकचळवळीच्या या कला महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व कौशल्य प्रशिक्षणात सहभाग घेतला. रंगभरण स्पर्धेत सुमारे ४५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, तर पर्यावरणपूरक गणपती निर्मितीमध्ये ८३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मातीकाम, पेंटिंग, वॉटर कलर, संगीत, गायन, नृत्य, झुम्बा डान्स, थ्रीडी पेंटिंग, कलाबाहुली काम, कॅलिग्राफी तसेच ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण अशा विविध कला व कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.

‘कौशल्य विकासातून घडतील यशस्वी तरुण’

बाळासाहेब थोरात म्हणाले की, जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून निरोगी समाजनिर्मितीसोबतच भावी पिढी समृद्ध घडविण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही कलागुण असतात. त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर ते निश्चितच यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी संगमनेरमध्ये सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या कला-कौशल्यांच्या माध्यमातून भविष्यात विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे थोरात यांनी सांगितले.

छोट्या कौशल्यांतून मोठे कलाकार घडतात : डॉ. तांबे

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, केवळ गुणवंत विद्यार्थी नव्हे तर समृद्ध आणि सुजाण नागरिक घडविण्यासाठी जयहिंद लोकचळवळ सातत्याने काम करत आहे. दोन दिवसांच्या शिबिरात विद्यार्थ्यांना अनेक कला व कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले. या कौशल्यांचा उपयोग त्यांच्या भावी जीवनात नक्कीच होईल. छोट्या-छोट्या कौशल्यांतून मोठे कलाकार निर्माण होऊ शकतात, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या महोत्सवातून मिळाले आहे.

यावेळी डॉ. नामदेव गुंजाळ, समन्वयक प्रकाश पारखे, मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, संजय मासाळ, विकास भालेराव, कला संघटनेचे अध्यक्ष संतोष गोरे, राजू गोरे, विनोद राऊत, हस्ताक्षर आर्टिस्ट सिसोदे, दत्ता बटवाल, संजय सोनवणे, बजरंग जेडगुले, साहेबराव गुंजाळ, सुनील कवडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नामदेव गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पारखे यांनी केले, तर चांगदेव खेमनर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहरातील नागरिक, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!