विद्यार्थ्यांनी शाळा स्वच्छ करायची की शिक्षण घ्यायचे ? – भाऊ चासकर 

५ हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांतील शाळांच्या स्वच्छतेचा मार्ग मोकळा ; लहान गावांतील शाळांचा प्रश्न मात्र कायम

संगमनेर | प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छता कर्मचारी नसल्याने शाळेचे आवार, वर्गखोल्या तसेच स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे. अनेक ठिकाणी ही कामे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जात असल्याने त्यावर पालक आणि नागरिकांकडून आक्षेप घेतला जात आहे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेणे आणि प्रत्यक्ष श्रमसंस्कार करणे योग्य असले, तरी शाळेची नियमित स्वच्छता ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असावी का, असा असावा ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे भाऊ चासकर यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नावर महत्त्वाची भूमिका मांडली. ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत जिल्हा परिषद शाळांचे आवार आणि स्वच्छतागृहे स्वच्छ करून घेण्याचा आग्रह त्यांनी धरला. ग्रामविकास मंत्र्यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिल्याने ५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधील ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी आता शाळांची स्वच्छता करणार आहेत.

या निर्णयामुळे मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधील शाळांचा स्वच्छतेचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. मात्र, ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांतील जिल्हा परिषद शाळांचे काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्यामुळे केवळ लोकसंख्येच्या निकषावर उपाय न करता सर्वच जिल्हा परिषद शाळांसाठी समान आणि व्यवहार्य धोरण निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी व्यवस्था हवी

विद्यार्थ्यांकडून शाळेची स्वच्छता करून घेण्याचा प्रश्न केवळ एका गावापुरता किंवा एखाद्या शाळेपुरता मर्यादित नाही. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरच अतिरिक्त जबाबदारी येते. त्यामुळे या प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढण्यापेक्षा प्रत्येक शाळेच्या गरजेनुसार स्वतंत्र स्वच्छता व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे.

प्रत्येक शाळेसाठी आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने किंवा अन्य व्यवहार्य पर्यायांचा विचार करून स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येईल. त्यातून शाळेची स्वच्छता नियमित, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतची जाणीव निर्माण करण्यासाठी श्रमसंस्काराच्या माध्यमातून मर्यादित स्वरूपातील स्वच्छता उपक्रम राबविता येतील.

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व शिकावे, श्रमाची प्रतिष्ठा समजून घ्यावी ; मात्र शाळेची नियमित स्वच्छता करणे ही त्यांचीच जबाबदारी असू नये. शिक्षण घेण्यासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या कामासाठी वापरण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी शालेय वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. — भाऊ चासकर

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!