अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी रुग्णालयासाठी ९८१ पदांना मंजुरी

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी आवश्यक ९८१ पदांच्या निर्मितीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यासोबतच स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी या पदनिर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने रुग्णालयाच्या कार्यक्षम संचालनासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर येथे १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता रुग्णालयासाठी नियमित गट-अ, गट-ब व गट-कमधील ५१५ पदे तसेच आउटसोर्सिंगद्वारे ४६६ मनुष्यबळ सेवा अशा एकूण ९८१ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही पदे चार टप्प्यांत भरली जाणार असून पहिल्या टप्प्यातील पदनिर्मिती तत्काळ केली जाणार आहे.

या पदनिर्मितीमुळे वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, लिपिक, वाहनचालक तसेच विविध तांत्रिक व सहाय्यक पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे ग्रामीण, निमशहरी व दुर्गम भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!