अविष्कार स्पर्धेतून ग्रामीण भागात नवे संशोधक घडतील – प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते

अहिल्यानगर जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचे ३९१ संशोधन प्रकल्प सादर ; २५ तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची मोठी क्षमता असून, त्यांच्या जिज्ञासेला, चिकित्सक विचारांना आणि प्रयोगशीलतेला योग्य दिशा मिळाल्यास उद्याचे नवे संशोधक घडतील, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अविष्कार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ३३ महाविद्यालयांमधून तब्बल ३९१ संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. प्रकल्पांचे परीक्षण करण्यासाठी विद्यापीठाचे २५ तज्ज्ञ परीक्षक उपस्थित होते.

या प्रसंगी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, आजच्या काळातील विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून संशोधनाकडे वळावे, असे आवाहन केले. अविष्कार ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची प्रचंड क्षमता असून, त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.

समाजातील विविध समस्यांचा अभ्यास करून त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचार यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवाव्यात, असेही डॉ. तांबे यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांनी विद्यार्थ्यांनी अविष्कार स्पर्धेकडे केवळ पारितोषिक मिळविण्याची संधी म्हणून न पाहता, स्वतःचे संशोधनविषयक विचार मांडण्याचे, नवीन गोष्टी शिकण्याचे आणि संशोधनाचा दृष्टिकोन विकसित करण्याचे व्यासपीठ म्हणून पाहावे, असे प्रतिपादन केले. अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करणे हे संशोधनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर स्पर्धेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते, संस्थेचे संचालक प्रा. बाबा खरात, आयक्यूएसी समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, अविष्कार स्पर्धेचे समन्वयक प्रा. डी. सी. पवार, महाविद्यालयाचे संशोधन समन्वयक डॉ. विजयकांत बैरागी आणि प्रशासन अधिकारी गोरक्षनाथ पानसरे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. विजयकांत बैरागी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी. सी. पवार यांनी आभार मानले, तर प्रा. कोमल म्हस्के आणि डॉ. ज्योती हासे यांनी सूत्रसंचालन केले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, समितीप्रमुख, समिती सदस्य आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध महाविद्यालयांतील संशोधन प्रकल्पांचे मार्गदर्शक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!