संगमनेरच्या तीन शाळांना ६२ लाखांची शैक्षणिक ‘बळकटी’ !

नवीन वर्गखोल्या व पायाभूत सुविधांसाठी निधी ; आमदार अमोल खताळ यांची माहिती

संगमनेर / प्रतिनिधी :

समग्र शिक्षा योजना २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील कसारा दुमाला (सावंतवस्ती), तळेगाव दिघे (धनगरवाडी) आणि मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या व पायाभूत सुविधांसाठी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने अध्यापनासाठी अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन संबंधित शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्यांचे बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे आमदार खताळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

या निधीतून कसारा दुमाला येथील सावंतवस्ती, तळेगाव दिघे येथील धनगरवाडी आणि मिर्झापूर येथील शाळांमध्ये आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. नवीन वर्गखोल्या उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना अधिक प्रशस्त व सुरक्षित जागेत शिक्षण घेता येणार असून, शिक्षकांनाही अध्यापनाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शाळांच्या इमारती, वर्गखोल्या आणि मूलभूत सुविधांचा विकास झाल्यास विद्यार्थ्यांसाठी अधिक पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या निधीमुळे संबंधित गावांतील शाळांच्या पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!