राजापूर जि.प. केंद्रशाळेतील शाळा व्यवस्थापन समिती निवडीवर पालकांचा आक्षेप

निवड प्रक्रिया तात्काळ रद्द करा ; सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरनिवड घेण्याची मागणी

संगमनेर प्रतिनिधी –

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, राजापूर येथे दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड प्रक्रियेवर पालकांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करत ही निवड प्रक्रिया तात्काळ रद्द करून पंचायत समितीच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्याने निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे करण्यात आली आहे.

पालकांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार, ४ सप्टेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समिती निवड तसेच इतर सहा विषयांवर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, इतर विषयांना महत्त्व न देता केवळ शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीवर भर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पालकांनी उपस्थित केलेले १२ गंभीर आक्षेप

१) बैठक न घेता मेळावा :

शाळा व्यवस्थापन समितीची बैठक न घेता अध्यक्षांना अर्धवट माहिती देऊन अचानक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२) अजेंडा आदल्या दिवशी देण्याचा आरोप :

पालक मेळाव्याचा अजेंडा हेतुपुरस्सर आदल्या दिवशी संध्याकाळी देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता मेळावा घेण्यात आला. अजेंडा पालकांना पाच ते सात दिवस अगोदर देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे.

३) कोरमबाबत आक्षेप :

निवड प्रक्रियेसाठी आवश्यक कोरम पूर्ण नसतानाही ज्या ग्रामस्थांचे विद्यार्थी शाळेत नाहीत, अशा ग्रामस्थांना पालक मेळाव्यात बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

४) शिक्षक व समितीला विश्वासात न घेतल्याचा आरोप :

मेळाव्याचे आयोजन करताना शाळा व्यवस्थापन समिती तसेच सहकारी शिक्षकांना विचारात घेतले गेले नाही. उलट त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन गैरवर्तन करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

५) शाळेत राजकारण व दबावाचा आरोप :

शाळेसारख्या पवित्र जागेत राजकारण करून पालकांवर दबाव निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मेळाव्याच्या आदल्या दिवशीच संभाव्य सदस्यांची निवड निश्चित करण्यात आली होती, असा दावा करण्यात आला आहे.

६) पालकांना बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप :

शाळा व्यवस्थापन समिती व खऱ्या पालकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद आहे.

७) विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग :

मेळाव्याचे विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग करून पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

८) बाह्य शक्तींचा वापर केल्याचा आरोप :

निवड प्रक्रियेत पालकांव्यतिरिक्त बाह्य शक्तींचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच मर्जीतील शिक्षणतज्ज्ञ घेण्यासाठी मेळाव्यातच निवड करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

९) शासन निर्णयाची पायमल्ली केल्याचा आरोप :

शाळा व्यवस्थापन समितीच्या शासन निर्णयाची पायमल्ली करण्यात आली. स्वतःच्या सोयीनुसार शासन निर्णयाचे वाचन करून पालकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

१०) जातनिहाय प्रतिनिधित्वावर आक्षेप :

निवड प्रक्रिया राबविताना जातनिहाय योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. स्वतःच्या मर्जीने नावे घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

११) पारदर्शक निवड प्रक्रिया नसल्याचा आरोप :

निवड प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली नसल्याचे पालकांनी म्हटले आहे.

१२) मागील अध्यक्ष निवडीचा कालावधी पूर्ण नसल्याचा दावा :

अध्यक्षांची निवड ३० जून २०२५ रोजी झालेली असून अद्याप दोन वर्षे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे करण्यात आलेली पुनर्गठन प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्गठनाऐवजी नियमानुसार पुनर्रचना होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘मेळाव्याला राजकीय रंग’ दिल्याचा आरोप

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर पालक मेळाव्याला पूर्णपणे राजकीय रंग देऊन राजकीय लोकांचा सहभाग घेऊन निवड प्रक्रिया राबविण्यात आली. संबंधित शिक्षिकेविरोधात यापूर्वीही अनेक गंभीर तक्रारी आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पालकांनी झालेली शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि पंचायत समितीच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना व निवड प्रक्रिया पुन्हा घेण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

आता शिक्षण विभाग या तक्रारीची दखल घेऊन राजापूर केंद्रशाळेतील शाळा व्यवस्थापन समिती निवड प्रक्रियेबाबत काय निर्णय घेतो, याकडे पालकांचे आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!