संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

संगमनेर (प्रतिनिधी) :

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, सुप्त कलागुण आणि विविध कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जय हिंद लोकचळवळीच्या वतीने स्व. डॉ. देवेंद्र ओहरा यांच्या ३३व्या जयंतीनिमित्त आयोजित बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन झाले.

स्व. डॉ. देवेंद्र ओहरा यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची स्मृती जपण्यासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जात आहे. तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी या महोत्सवातून व्यासपीठ मिळत असल्याचे जय हिंद लोकचळवळीचे सेक्रेटरी डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी सांगितले.

स्व. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा तथा जय हिंद महिला मंचच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नामदेवराव गुंजाळ होते. ॲड. सुहास आहेर, अंकुश ताजणे यांच्यासह ओहरा परिवार व शिक्षण-कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

चित्रकला, निसर्गचित्र, मातीकाम, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, कागदी फुले, डूडल आर्ट, ३डी प्रिंटिंग, ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण, संगीत, कॅलिग्राफी, वॉटर कलर, बाहुली काम आणि झुंबा डान्स अशा विविध कला व आधुनिक कौशल्यांचा महोत्सवात समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक व व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. विविध स्पर्धांनंतर उत्कृष्ट बालकलाकारांना विशेष पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख प्रकाश पारखे, कलाध्यापक संघाचे अध्यक्ष संतोष गोरे, सचिव रावताळे सर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!