सफायर आयडॉल मंचावर अवतरले गायक कलावंत !

प्रतिनिधी — 

संगमनेर पंचक्रोशीतील ८ वर्षांपासून ते ७० वयोगटांतील गायक कलावंतांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करीत लायन्स सफायरच्या वतीने आयोजित गायन स्पर्धेत रंगत वाढवली. लायन्स क्लब संगमनेर सफायरच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्थानिक गायक कलावंतांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आले होती. सफायर आयडाॅल स्पर्धेचे हे ९ वे वर्ष आहे.

कलावंतांसाठी सफायर आयडाॅल मंच हे हक्काचे व्यासपीठ आहे. अनेक स्थानिक व गुणवंत कलाकारांना आपली कला त्यांना या ठिकाणी सादर करता येते व भविष्यातील सुवर्णसंधी त्यांना या निमित्ताने प्राप्त होतात असे प्रतिपादन लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष व माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी यांनी केले. याप्रसंगी सुवर्णा मालपाणी, युनिकॉर्नचे संचालक गिरीश चुग, प्रकल्प प्रमुख सुनीता मालपाणी, संदीप चोथवे, डॉ. जितेंद्र पाटील, अध्यक्ष अतुल अभंग आदी उपस्थित होते.

सुवर्णा मालपाणी यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून स्थानिक कलाकारांमध्ये उत्कृष्ट गायक निर्माण करणारी ही स्पर्धा असल्याचे सांगितले. या मंचावरून अनेक गुणी कलावंत तयार होऊन आज महाराष्ट्रात विविध स्पर्धा ते गाजवत आहेत आणि संगमनेरचे नांव मोठे करत आहेत. ही संगमनेरकरांसाठी, सफायर क्लबसाठी आनंददायी बाब आहे.

सफायर आयडॉल स्पर्धा विद्यालय स्तर, महाविद्यालय स्तर व खुला गट अशा एकूण ५ गटात पार पडली. गायकांनी या स्पर्धेसाठी ऑडिशन दिल्या. त्यामधून निवडल्या गेलेल्या गायकांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी ३ ते ५ प्रथम गट, ६ ते ७ दुसरा गट, ८ ते १० तीसरा गट अशा तीनही गट मिळून ५० कलावंत विद्यार्थ्यांनी आपली गायन कला सादर केली. दुसर्‍या दिवशी महाविद्यालयीन गट व खुल्या गटातील ६० कलावंत गायकांनी बहारदार पद्धतीने गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सदर स्पर्धेत शंभरहून अधिक गायक कलावंतांनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेतून प्रथम गटात प्रणित उमप, द्वितीय गटात यश केदारी, तृतीय गटात तन्वीर मिसाळ, महाविद्यालयीन गटात आकाश घुले, खुल्या गटात रमेश धर्माधिकारी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत सफायर आयडॉल २०२४ होण्याचा मान मिळविला.

अत्यंत बहारदार व तितक्याच स्पर्धात्मक आलेल्या आयडॉल स्पर्धेचे परीक्षक म्हणून सतीश मालवणकर, अनिरूद्ध शाळीग्राम, राम आहेर, प्रा.श्रीहरी पिंगळे यांनी केले. प्रास्तविक प्रकल्प प्रमुख संदीप चोथवे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. जितेंद्र पाटील, प्रीती काळे, नम्रता अभंग यांनी केले. सफायर आयडॉल कार्यक्रमाच्या उत्कृष्ट संगीत संयोजनाची जबाबदारी गणेश गोर्डे, एडविन पेरी मॅडम, मंगेश बिडवे, सौरभ रणधीर, आकाश साळवे यांनी सांभाळली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जेष्ठ सदस्य श्रीनिवास भंडारी, धनंजय गुंजाळ, कल्याण कासट, महेश डंग, डॉ. अमोल पाठक, अतुल अभंग, जितेश लोढा, कल्पेश मर्दा, तसेच मालपाणी लॉन्सचे मॅनेजर विनायक भोईर, दत्ता जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!