संगमनेरात डॉ. अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी महानाट्य !
स्थानिक कलाकारांना काम करण्याची संधी… आज (ता. २५) होणार ऑडिशन
प्रतिनिधी —
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य सादर होणार असून या महानाट्यात स्थानिक कलावंतांना संधी मिळणार आहे. यासाठी इच्छुक कलाकारांची ऑडिशन आज गुरुवारी (ता.२५) सकाळी १० वाजता ‘शॅम्प्रो’ येथे होणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित “शिवपुत्र संभाजी”हे महानाट्य ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता शहरातील जाणता राजा मैदानावर सादर होणार आहे.
या महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कवी कलशांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेरखान आणि मुकर्रबखानाच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडकेंसोबत अनेक सिनेकलावंतांचा सहभाग असणार आहे.

तडाखेबाज संवाद, १२० फुटी भव्यदिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती,घोडे आणि बैलगाड्यांचा वापर, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबत १५० पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग या महानाट्यात आहे.
या महानाट्यात स्थानिक कलाकारांना देखील काम करण्याची संधी मिळणार आहे. या सर्वांची ऑडिशन गुरुवारी सकाळी १० वाजता एसएमबीटी डेंटल कॉलेजसमोर शॅम्प्रो बिल्डिंग येथे होणार आहे.

सहभागासाठी इच्छुकांनी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात गौरव समिती व अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे. रामदास तांबडे (९९६००४२३७४), अभिजित पवार (९९७५२६४७७२) व जयेंद्र दुधे (९७३०४६८४८४)

