शहर स्वच्छतेपासून नवीन पदाधिकाऱ्यांची कामाला सुरुवात
संगमनेर बसस्थानक परिसरासह लक्ष्मी रोडची सफाई
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
नगरपालिका निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे व सर्व नगरसेवक यांनी संगमनेर बस स्थानक परिसर व नाशिक पुणे महामार्ग लक्ष्मी रोड परिसराची हातात झाडू घेऊन साफसफाई केली.

संगमनेर हायटेक बस स्थानक येथील दत्त मंदिरात महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. मैथिली तांबे आणि सर्व नगरसेवक यांनी श्री दत्ताची आरती करून परिसर स्वच्छ करीत कामाला सुरुवात केली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, सीमाताई खटाटे, भारत बोऱ्हाडे, अर्चना दिघे, सौरभ कासार, शोभाताई पवार, प्राची काशीद, किशोर पवार, डॉ.अनुराधा सातपुते, वनिता गाडे, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दिपाली पांचारिया, अमजद खान पठाण, डॉ.दानिश, किशोर टोकसे, प्रियंका शहा, शैलेश कलंत्री, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अजित काकडे, सतीश आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर शहरातील हायटेक बस स्थानक परिसर हा शहराचा महत्त्वाचा भाग असून या परिसरामध्ये मागील एक वर्षांमध्ये फ्लेक्समुळे विद्रूपीकरण झाले होते. याचबरोबर खूप अस्वच्छता झाली होती. नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेताना रात्री संगमनेर बस स्थानक व नाशिक पुणे रोड ऑरेंज कॉर्नर ते संगमनेर बस स्थानक धुऊन काढला. याचबरोबर सकाळी स्वच्छता मोहीम हाती घेतली.

याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर शहराला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. संगमनेर शहर हे कुटुंब आहे सर्व समाजाचे लोक आनंदाने येथे राहतात. ही परंपरा नव्या पदाधिकाऱ्यांनी पुढे न्यावयाचे आहे. याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य मग्न राहून जनतेची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर ही आपली संकल्पना आहे आणि डॉ.मैथिली तांबे व त्यांचे सर्व नवीन नगरसेवक अत्यंत प्रभावीपणे काम करून ही संकल्पना पुढे नेतील आणि शहराला देशात अग्रगण्य बनवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर डॉ.मैथिली तांबे म्हणाल्या की, संगमनेर शहरातील जनतेने मोठा विश्वास आमच्या सगळ्यांवर दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपते ही आपली संस्कृती आहे. सर्वांनी एकत्र येऊन शहराला पुढे घेऊन जाऊया याचबरोबर स्वच्छ शहर ही संकल्पना अधिक प्रभावी करू असे त्या म्हणाल्या. यावेळी संगमनेर शहरातील युवक कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रात्रीच कामाला प्रारंभ
विजय उत्सव साजरा झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पदाधिकाऱ्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. संगमनेर बस स्थानक परिसर व नाशिक – पुणे रोड ऑरेंज कॉर्नर पर्यंत रात्री स्वच्छ धुऊन काढला याचबरोबर सकाळी दत्त मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा देवी मंदिर हनुमान मंदिर या ठिकाणी अभिवादन करून कामाला सुरुवात केली.
