शिक्षकांचे योगदान देशाला विश्वगुरु करणारे – राजेश मालपाणी
संगमनेर मर्चंट बँकेच्या वतीने शिक्षकांचा सत्कार
संगमनेर प्रतिनिधी दिनांक —
शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक असून देशाच्या जडणघडणीमध्ये या घटकाचे योगदान अविस्मरणीय आहे देशाला सर्व क्षेत्रांमध्ये समृद्ध करण्याची कामगिरी शिक्षकांच्या हातून घडत असते त्यामुळे शिक्षकांचे ऋण फार मोठे आहे असे प्रतिपादन संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन उद्योगपती राजेश मालपाणी यांनी येथे केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून संगमनेर मर्चंट बँकेच्या वतीने गुरुजनांच्या सत्काराचा कार्यक्रम दरवर्षी झाला. या वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करताना मालपणी यांनी वरील प्रमाणे आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिक्षक नेहमीच उद्याची पिढी घडवत असतो. त्यांच्या हाताखालून जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देत असतो. हेच विद्यार्थी देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करून देशाला पुढे नेत असतात. असे गुणवान शिष्य घडविणारे शिक्षक नेहमीच वंदनीय ठरतात. त्यामुळे त्यांचे ऋण कधीही न फिटणारे असते असे मालपाणी आपल्या भाषणात म्हणाले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांच्या योगदानाविषयी सविस्तर आढावा घेतला आणि सर्वांना हेलावून टाकणारी हृदयाला हात घालणारी एक हृदयस्पर्शी बोधकथा सांगितली. माझ्याही जीवनप्रवासात आई वडिलांच्या नंतर शालेय व कॉलेज च्या अनेक शिक्षकांचा मोठा प्रभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.

बँकेचे माजी चेअरमन संतोष करवा, श्रीगोपाल पडताणी यांची समयोचित भाषणे झाली. संगमनेर मर्चंट बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यामध्ये एकूण १६ गुरुजनांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलचे गिरीश टोकसे, नितीन सूर्यवंशी, क्षितिज मोहपात्रा, मालपाणी विद्यालयातील विनायक हिरे , संगीता परदेशी, वर्षा भडांगे, मच्छिंद्र हापसे, कनोली येथील थोरात प्राथमिक विद्या मंदिरातील नम्रता पवार, अर्जुन खोतकर, सचिन खरात, वेल्हाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वैशाली अभंग , संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड, श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहुल देशमुख, संगमनेर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख वंदना भवरे, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शरद सावंत, आणि संगमनेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. बी. ताशीलदार इत्यादींचा समावेश होता. सत्कारार्थी शिक्षकांचा परिचय बँकेचे संचालक सम्राट भंडारी, प्रकाश कलंत्री, मुकेश कोठारी, महेश डंग, रवी पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बँकेच्या विविध क्षेत्रातील कार्याची आणि प्रगतीची माहिती शिक्षक वृंदाला दिली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे बँकेची भक्कम आर्थिक स्थिती आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य यामुळे प्रभावित होऊन कनोली येथील शिक्षिका नम्रता पवार यांनी लगेचच आपल्या मातोश्रींच्या नावे एक लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवली. त्यांच्या या कृतीचे टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी स्वागत केले. शिक्षकांच्या वतीने संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड प्राध्यापिका नम्रता पवार, मच्छिंद्र हापसे, सचिन खरात, यांची प्रातिनिधीक भाषणे झाली. त्यांनी आपापल्या भाषणात बँकेच्या उपक्रमाचे कौतुक करून बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन , संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाला धन्यवाद दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश राठी यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई यांनी केले.
