संगमनेर नगरपरिषदेचा राज्यातील पहिला उपक्रम !

भटक्या श्वानांना मायक्रोचिपची ओळख

निर्बीजीकरण, अँटी रेबीज लसीकरणातून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही बळ

संगमनेर (प्रतिनिधी) : 

भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी आणि वैज्ञानिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संगमनेर नगरपरिषदेने राज्यात आदर्श ठरेल असा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आणि अँटी रेबीज लसीकरणानंतर प्रत्येक भटक्या श्वानाला मायक्रोचिप बसविण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम संगमनेरमध्ये राबविण्यात येत असून, या माध्यमातून श्वानांची अचूक ओळख, त्यांचा मागोवा आणि आरोग्य व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रसिध्दी विभागाकडून तशी प्रेस नोट देण्यात आली आहे.

शहरातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे, रेबीजचा धोका कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, या उद्देशाने नगरपरिषदेने ही व्यापक मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात प्राणी कल्याण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींमध्ये समतोल साधण्यात आला आहे.

शहरातील विविध भागांतून आणलेल्या प्रत्येक भटक्या श्वानाची सर्वप्रथम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी केली जाते. शस्त्रक्रियेसाठी योग्य असलेल्या श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात येते आणि त्यांना अँटी रेबीज लस दिली जाते. मात्र, गर्भवती, नुकतीच पिल्लांना जन्म दिलेली किंवा आरोग्याच्या कारणास्तव शस्त्रक्रिया करणे शक्य नसलेली श्वाने कोणतीही शस्त्रक्रिया न करता पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सोडण्यात येतात.

निर्बीजीकरणानंतर काही दिवस श्वानांची विशेष काळजी घेतली जाते. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांच्या शरीरात मायक्रोचिप बसविण्यात येते. या चिपमुळे संबंधित श्वानाची कायमस्वरूपी ओळख निश्चित होते. भविष्यात त्याचे लसीकरण, आरोग्य तपशील आणि आवश्यक माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर संबंधित श्वानाला ज्या परिसरातून आणले होते, त्याच ठिकाणी सुरक्षितपणे सोडण्यात येते.

या उपक्रमामुळे भटक्या श्वानांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन होण्यास मदत होणार असून, रेबीजचा धोका कमी होईल, नागरिकांचा त्रास कमी होईल आणि प्राण्यांप्रती संवेदनशील दृष्टीकोन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

निर्बीजीकरण, अँटी रेबीज लसीकरण आणि मायक्रोचिपिंग या तिन्ही बाबींचा एकत्रितपणे अवलंब करणारी संगमनेर नगरपरिषद ही महाराष्ट्रातील पहिली नगरपरिषद ठरली आहे. या अभिनव उपक्रमाची दखल राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही घेतली जात असून, भविष्यात हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श मॉडेल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!