अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरात पोहोचवा : आमदार अमोल खताळ
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी
संगमनेर | प्रतिनिधी
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर कष्टकरी, शेतकरी, कामगार तसेच वंचित-शोषित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी दिलेले योगदान इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आजच्या समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ शिवसेना, महायुती आणि लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार खताळ बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साथी विनायक माळवे होते. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, तालुका संघटक मंजाबापू साळवे, राजेंद्र बलसाने, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, प्रवीण दिड्डी, विकास पुंड, बाळासाहेब शेटे, विकास जाधव, संगीता पुंड, सपना जाधव, आरती पगारे आदी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांनी उभारलेला संघर्ष आणि शाहिरीच्या माध्यमातून केलेली जनजागृती आजही प्रेरणादायी आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी आपल्या शाहिरीतून आवाज बुलंद केला. तसेच समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.

ते पुढे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य देश-विदेशात गौरवले गेले असून ते केवळ साहित्यिक नव्हते, तर सामान्य माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. जातीभेद, वर्गीय शोषण आणि सामाजिक अन्यायाविरोधात त्यांनी आपल्या लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून प्रभावी लढा उभारला. त्यांच्या विचारांनी लाखो वंचितांना आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली आहे.
संगमनेरच्या विकासात सर्व समाजघटकांना समान न्याय : आमदार अमोल खताळ
संगमनेरच्या विकासात सर्व समाजघटकांना समान न्याय देण्याचा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या करण्याची परंपरा संगमनेरमध्ये सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारच्या पुढाकारातून मुंबईतील चिरागनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक व प्रशिक्षण संस्थेसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुण उद्योजक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
