विकासकामे बाजूला, संगमनेरात फक्त ‘स्पर्धां’चीच रंगबिरंगी नौटंकी !
आमदार खताळ आणि तांबे यांच्यातील सांस्कृतिक वर्चस्ववादाची लढाई आता टवाळकीचा विषय
विशेष प्रतिनिधी –
सध्या संगमनेर तालुका आणि शहरामध्ये मूळ विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असताना, दुसरीकडे मात्र राजकीय स्टंटबाजीसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्याची चढाओढ सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. आमदार अमोल खताळ पाटील आणि आमदार सत्यजित तांबे पाटील यांच्या समर्थकांमध्ये संगमनेरच्या सांस्कृतिक व राजकीय क्षितिजावर वर्चस्व गाजवण्यासाठी केवळ ‘स्पर्धा घेण्याची स्पर्धा’ सुरू असून, या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक पुरते वैतागले आहेत.
सर्वसामान्य जनता वेठीस ; ध्वनी प्रदूषण आणि फुकटची उधळपट्टी
दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून या शक्तिप्रदर्शनाला उघडपणे खतपाणी घातले जात आहे. या स्पर्धांच्या नावाखाली फ्लेक्सबाजी आणि रस्ते अडवून कार्यक्रम घेण्याची चळवळ सुरू आहे. लाभार्थी आणि कार्यकर्त्यांचा घोळका वगळता, सामान्य नागरिकांना अशा कार्यक्रमांमध्ये बळजबरीने उपस्थित राहावे लागत असल्याचे आरोप होत आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर तालुकाप्रमुख अमर कदारी यांनी या धोरणावर सोशल मीडियातून अत्यंत कडक शब्दांत टीका करत स्थानिक लोकप्रतिनिधींचे वाभाडे काढले आहेत. विकासाच्या स्पर्धा ऐवजी भलत्याच स्पर्धांचा पूर शहरात आणि तालुक्यात चालू आहे. कुत्रे पकडणे, कुत्र्यांची नसबंदी करणे, दहीहंडी, ढोल-ताशा पथके, डीजेचा दणदणाट कोणाचा मोठा, महावादन महामिळावे आणि विनापरवाना फ्लेक्स लावण्याच्या भलत्याच स्पर्धा सुरू आहेत.
नागरिकांच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या संगमनेर बस स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करून, त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पैसा येतो कुठून ?
राज्यभरात इतर तालुक्यांमध्ये विकासकामांची स्पर्धा सुरू असताना, संगमनेरात मात्र पैशांची उधळपट्टी सुरू आहे. “या सर्व कार्यक्रमांसाठी एवढा अफाट पैसा येतो कुठून?” हा आता मोठा संशोधनाचा विषय बनला असल्याचे बोलले जात आहे. अशा दिखाऊ कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात डीजे, लाइटिंग, मोठमोठे स्पीकर्स, लेझर शो, भव्य व्यासपीठ, वाहने व इतर बाबींसाठी लागणारा खर्च मोठा आहे. हा पैसा नेमका कोणाचा ? याची देखील चर्चा आहे.
विकास सोडून फक्त ‘फटाके उडवण्या’चे काम !
एकंदरीत पाहता, तालुक्याचे रस्ते, पाणी, आरोग्य, वादग्रस्त असलेला शहर व तालुक्यातील विजेचा प्रश्न आणि इतर मूलभूत सोयी-सुविधा हे मूळ विकासकामांचे मुद्दे पूर्णपणे बाजूला फेकून दिले गेले आहेत. बंद पडलेल्या एसटीपी प्लांट सारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर दोन्ही आमदार अक्षरशः तोंडाला चिकट पट्ट्या लावून बसले आहेत. फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि वर्चस्वासाठी हवेत ‘फटाके उडवण्याचे’ काम सुरू असून, संगमनेरची जनता आता या रोजच्या नौटंकीला आणि स्टंटबाजीला कंटाळली आहे.
