भंडारदरा धरणातून सोमवारपासून आवर्तन

खरीप पिकांना मिळणार दिलासा

संगमनेर प्रतिनिधी : 

गणेशोत्सव तसेच ग्रामीण भागातील शेती पिकांसाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागाने सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ पासून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली.

संगमनेर तालुक्यात यंदा अपेक्षेइतका पाऊस झालेला नसल्याने शेती पिके धोक्यात आली आहेत. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन पाण्याची उपलब्धता करून देण्याची मागणी केली होती.

तसेच गणेश विसर्जनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, अशी अपेक्षा गणेशभक्त आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी लोणी येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आगामी गणेशोत्सव आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाई लक्षात घेऊन भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.

यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीतही आमदार खताळ यांनी आवर्तन सोडण्याचा आग्रह धरला. त्याची दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी दि. १४ सप्टेंबरपासून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले.

जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!