जिल्ह्यात अवैध गुटखा-मावाविक्रेत्यांविरुद्ध एलसीबीची धडक कारवाई – एकाच वेळी ९ छापे
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली. सोनई, नेवासा, कोपरगाव तालुका, राहुरी आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ९ ठिकाणी छापे टाकून १७ आरोपींविरुद्ध ९ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकूण १ लाख ८१ हजार २६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन कारवायांमध्ये राहुल धनवटे, संदिप शिंदे, लियाकत शेख यांच्यासह एका फरार आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवायांमध्ये अनुक्रमे १९ हजार ८००, १० हजार आणि २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नेवासा येथे सागर आलवणे याच्याविरुद्ध कारवाई करून ३ हजार १६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोपरगाव तालुका हद्दीत दत्तात्रय गायकवाड व एका फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून २० हजार ६०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राहुरी परिसरात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये शफीक शेख, मनोज कळमकर, वैभव कोकाटे व याकुब पठाण यांच्यासह तीन फरार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या दोन्ही कारवायांत अनुक्रमे ४४ हजार व ३३ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. चैतन्य परदेशी व एका फरार आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्यात ७ हजार ७४० रुपये, तर गौरव नाईक व अन्य दोन फरार आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यात १५ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सर्व कारवायांमध्ये बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच लागू असलेल्या प्रकरणांत कलम ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली. अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
