कोयत्याने वार करून केलेला खून उघडकीस ; चार जण ताब्यात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
खर्डा येथे मिरची पावडर डोळ्यात टाकून कोयत्याने वार करत तान्हाजी भास्कर बोराडे (रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांचा खून केल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात एका १८ वर्षीय तरुणासह तीन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी तान्हाजी बोराडे यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना ठार मारण्यात आले. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान प्रसाद अशोक अडागळे याने तीन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील एका आरोपीचा शोध पुणे येथे घेण्यात आला. त्यानंतर टाकळीमिया, ता. राहुरी येथे तपास करून उर्वरित आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये प्रसाद अशोक अडागळे (वय १८, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) याच्यासह वय १६ व १७ वर्षांचे तीन विधीसंघर्षीत बालक यांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या चौघांनाही पुढील तपासासाठी खर्डा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.



