धांदरफळ वीज प्रश्नावर आमदार खताळ यांच्या सूचना – वीज वितरण चे उपाय सुरू…
श्रेयासाठी ‘नौटंकी’ आंदोलन – कानवडे
संगमनेर : प्रतिनिधी —
धांदरफळ गटातील शेतकऱ्यांच्या थ्री-फेज वीजपुरवठ्याच्या प्रश्नाची आमदार अमोल खताळ पाटील यांनी तातडीने दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अतिरिक्त वीजदाब व तांत्रिक अडचणी दूर करून पुढील चार-पाच दिवसांत शेतकऱ्यांच्या सोयीच्या वेळेत थ्री-फेज वीजपुरवठा करण्याबाबत योग्य तो बदल करा, तसेच गणेशोत्सव काळात शेतकऱ्यांचा वीजपुरवठा अनावश्यकपणे खंडित होणार नाही, याची विशेष काळजी घ्या, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
सध्या धांदरफळ गटातील शेतीसाठीचा थ्री-फेज वीजपुरवठा रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत होत आहे. रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याने वीजपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी जोर धरत आहे.

महावितरणसमोरील तांत्रिक अडचणी आणि अतिरिक्त वीजदाबामुळे वीजपुरवठ्याच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. धांदरफळ गटातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न आमदार खताळ यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली.
श्रेयासाठी ‘नौटंकी’ आंदोलन नको !
दरम्यान, या प्रश्नावरून आज धांदरफळ येथे आंदोलन करण्यात आले. यावर शिवसेनेचे आशिष कानवडे यांनी आक्रमक भूमिका घेत “शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नावर श्रेयासाठी नौटंकी आंदोलन नको,” असा टोला लगावला.
महावितरणकडून तांत्रिक अडचणी दूर करण्याची प्रक्रिया सुरू असताना केवळ राजकीय श्रेयासाठी आंदोलन उभे करणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे राजकीयीकरण करण्याऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे कानवडे म्हणाले.
“सन २०२१ मध्ये ऐन पेरणीच्या काळात थकीत वीजबिलाच्या कारणावरून शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडली जात होती, तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविणारे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य कुठे होते?” असा सवाल कानवडे यांनी उपस्थित केला.

धांदरफळ गटातील वीजप्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून मोठ्या संख्येने ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर शेतकऱ्यांना दीर्घकाळ वीजवंचित राहू नये, यासाठी विनामूल्य नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही कानवडे यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांना दिवसा आणि त्यांच्या सोयीच्या वेळेत सुरळीत थ्री-फेज वीज मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण नको; कायमस्वरूपी समाधान हवे,” अशी स्पष्ट भूमिका कानवडे यांनी मांडली.
