संगमनेर बसस्थानकाचे गेट बंद ठेवण्याचा अजब कारभार !
प्रवाशांची गैरसोय थांबवा ; दोन्ही प्रवेशद्वारे कायमस्वरूपी खुले ठेवण्याची मागणी
संगमनेर / प्रतिनिधी :
संगमनेर बसस्थानकातील पूर्वेकडील महत्त्वाचे प्रवेशद्वार बंद ठेवून प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले प्रवेशद्वार बंद ठेवण्यामागे नेमके कारण काय? हा निर्णय कोणाच्या आदेशाने घेण्यात आला? असा संतप्त सवाल उपस्थित करत बसस्थानकाची दोन्ही प्रवेशद्वारे कायमस्वरूपी खुली ठेवण्याची मागणी सकल संगमनेरकर रहिवाशांनी केली आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अविनाश भोर यांच्यासह बसस्थानकातील गाळेधारकांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. बसस्थानकात प्रवाशांची सुरक्षित व सुलभ ये-जा तसेच बसची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी दोन्ही प्रवेशद्वारे खुली असणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या उत्तरेकडील प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले असून पूर्वेकडील महत्त्वाचे प्रवेशद्वार बंद आहे. परिणामी प्रवाशांना अनावश्यक फेरफटका मारावा लागत असून विशेषतः बसस्थानकात ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांची सोय प्राधान्याची असताना प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय का घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वार बंद असल्याचा फटका बसस्थानकातील गाळेधारक व स्थानिक व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
प्रवाशांची होणारी गैरसोय तातडीने थांबवून बंद केलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार पूर्ववत सुरू करावे. प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्याऐवजी त्यांची गैरसोय करणारा कारभार थांबवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या हितासाठी प्रवेशद्वार तातडीने खुले न केल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
