राजापूरच्या जि. प. शाळेत खाजगी वाचनालयाचा बेकायदेशीर कब्जा !
विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात ; आंदोलनाचा इशारा
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील जि. प. प्राथ. केंद्र शाळा राजापूर येथील शालेय आवारात कोणत्याही परवानगीशिवाय मागील १० वर्षांपासून ‘गुरुदेव रविंद्रनाथ टागोर’ हे खाजगी वाचनालय अनाधिकृतपणे सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे तात्काळ चौकशी करून खोली खाली करण्याची जोरदार मागणी केली आहे.
अनोळखी व्यक्तींच्या वावरामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात
शालेय आवारातील वर्ग खोलीत हे खाजगी वाचनालय बेकायदेशीरपणे चालवले जात आहे. येथे दररोज ये-जा करणाऱ्या अनोळखी व्यक्तींमुळे शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरक्षा समिती व शाळा व्यवस्थापन समितीने यासंदर्भात वारंवार ठराव घेऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नोटीस देऊनही जागा रिकामी करण्यास नकार
ग्रामपंचायत राजापूर, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने संबंधित वाचनालयाला जागा खाली करण्याबाबत वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, तरीही बळकावलेली वर्ग खोली खाली केली जात नसल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या ‘कुसुमाग्रज बालवाचनालया’ची अडवणूक
विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी जि. प. प्राथ. शाळेत नव्याने ‘कवी कुसुमाग्रज बालवाचनालय’ सुरू करण्यात आले आहे. परंतु, खाजगी वाचनालयाने जागा बळकावल्यामुळे या बालवाचनालयाच्या प्रभावी अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

प्रशासनाला इशारा : खोली खाली न झाल्यास केंद्र शाळेसमोर उपोषण !
शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, या बेकायदेशीर खाजगी वाचनालयाची योग्य ती चौकशी करून वर्ग खोली तात्काळ खाली करून द्यावी. अन्यथा, शाळा व्यवस्थापन समितीला कोणत्याही क्षणी केंद्र शाळेसमोर बसून तीव्र उपोषण छेडावे लागेल, असा थेट इशारा अर्जाद्वारे देण्यात आला आहे.
