डीजेच्या दणदणाटाविरोधात संगमनेरकरांचे प्रांताधिकार्यांना निवेदन
ढोल-ताशे, बँजो, फटाके अन् लेझर किरणांवरही बंदीची मागणी
संगमनेर / प्रतिनिधी :
उत्सवांच्या नावाखाली सुरू असलेला डीजेचा कर्णकर्कश दणदणाट, ढोल-ताशे, बँजो, फटाके आणि लेझर किरणांचा झगमगाट बंद करा, अशी ठाम मागणी संगमनेर शहरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन ॲड. निशा शिवूरकर व सहकाऱ्यांनी प्रांत अधिकारी संगमनेर यांना दिले.
निवेदनाचा स्वीकार नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी केला. या मागणीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्सव आणि मिरवणुकांमध्ये डीजे, ध्वनिक्षेपक, ढोल-ताशे व बँजोचा होणारा अमर्याद वापर नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यातच फटाक्यांचा आवाज आणि लेझर किरणांची तीव्रता यामुळे ध्वनी, वायू आणि प्रकाश प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असल्याचे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे.
कर्णकर्कश आवाज हा केवळ कानांचा प्रश्न नसून संपूर्ण शरीर आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न आहे, असे नमूद करताना नागरिकांनी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच पशु-पक्ष्यांवर होणाऱ्या परिणामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होण्यासोबतच चिडचिड, रक्तदाब आणि मानसिक तणाव वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मिरवणुका व कार्यक्रमांमध्ये ध्वनीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. विशेषतः तरुणांच्या श्रवणशक्तीवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करत डीजेमुळे झालेल्या अपघातांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये डीजेवरील निर्बंधांची मागणी होत असताना संगमनेर शहरातही प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. उत्सव साजरे करण्यास विरोध नसून, त्यासाठी नागरिकांच्या आरोग्याची आणि शांततेची किंमत मोजायला लावू नये, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
संगमनेर शहरात डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालावी आणि ध्वनी व प्रकाश प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या साधनांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निवेदनावर ॲड. निशा शिवूरकर, मंगल भावसार, तुकाराम पवार, शांताराम गोसावी, प्रा. शिवाजी गायकवाड, ॲड. मीनल देशमुख, ॲड. रंजना गवांदे, विजय खांडरे, ॲड. आर. एम. शेजुळ, संजय खतोडे, सुदाम पवार, सूर्यभान नागरे, गोपीनाथ घोडेकर यांच्यासह अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
