निळवंडेचे हक्काचे पाणी पळवण्यासाठीच ‘नदीजोड’चे गाजर
संगमनेर प्रतिनिधी –
निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी नदीजोड प्रकल्पाचे गाजर दाखवून दुसरीकडे पळवण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर संशय संगमनेर तालुक्यातून व्यक्त केला जात आहे. “पाण्याबरोबरच रेल्वे पळवण्यातही पटाईत असलेले राजकीय नेते आता नदीजोडच्या बहाण्याने निळवंडेचे पाणीही पळवतील,” असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
भोजापूर पूरचारीचा नुकताच नदीजोड प्रकल्पात समावेश करण्याची घोषणा झाली असली, तरी या निर्णयामागील राजकीय हेतूबाबत आणि सरकारच्या धोरणांवर शेतकऱ्यांनी अस्वस्थता व्यक्त केली आहे.
प्रकल्पांना आमचा विरोध नाही, पण घोषणाबाजीचे काय ?
भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, सरकारच्या अंमलबजावणीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सुरत-अहमदाबाद महामार्ग असो की शक्तीपीठ महामार्ग, अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या रखडलेले आहेत. हजारो कोटी रुपयांची कंत्राटदारांची देयके प्रलंबित असताना, संगमनेर तालुक्यातही फक्त ‘निधी आल्याच्या’ बातम्यांचा पाऊस पडतोय; प्रत्यक्षात एकही काम सुरू नाही. त्यामुळे नदीजोड प्रकल्प तरी कधी पूर्ण होणार ? असा सवाल विचारत भविष्यातील गाजर दाखवून आजच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

ताटात आलेले पाणी हिरावून घेऊ नका : बी. आर. चकोर
प्रकरणावर भाष्य करताना बी. आर. चकोर म्हणाले, “गेल्या ३० ते ४० वर्षांपासून अनेक पिढ्यांनी निळवंडेच्या पाण्याची वाट पाहिली आहे. आता कुठे निळवंडेचे पाणी पाटातून वाहताना दिसत आहे. हे पाणी अगदी आपल्या ताटाजवळ आले असून, केवळ शेतात पोहोचणे बाकी आहे. अशा वेळी स्थानिक पाईपलाईनची कामे रखडवून हे पाणी अन्यत्र वळवणे पूर्णपणे अयोग्य आहे. भविष्यातील नदीजोड प्रकल्प कधी पूर्ण होईल याची खात्री नसताना, सध्या उपलब्ध असणारे हक्काचे पाणी पळवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.”
स्थानिकांच्या बळीवर विकास नको : सचिन दिघे
सचिन दिघे यांनी थेट इशारा देताना सांगितले की, “नदीजोड प्रकल्प जरूर करा, पण स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याची किंमत मोजून नाही.” लक्ष विचलित करण्याचा राजकीय डाव असल्याचे बोलले जात असून अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण आणि डावा-उजवा कालवा पूर्ण झाला आहे, ज्यामुळे दुष्काळी भागात अखेर पाणी पोहोचले. मात्र, आता याच पाण्यावरून शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘नदीजोड’च्या नावाखाली नवे गाजर दाखवले जात असल्याचा आरोप होत आहे. “विकासकामांना आमचा अडथळा नाही, पण आधी निळवंडेचे हक्काचे पाणी आम्हा शेतकऱ्यांना मिळू द्या,” असे थेट आवाहन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केले आहे.
