“आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत” – अमर कतारींचा नगरपालिका सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महाविकास आघाडीत जुंपली !
संगमनेर प्रतिनिधी:
नगरपालिकेच्या लोकार्पण सोहळ्यावरून संगमनेरमधील महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफुस आता चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी सोमवारी होणाऱ्या नगरपालिकेच्या लोकार्पण कार्यक्रमावर अत्यंत सडेतोड शब्दांत टीका केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आमचा वापर करायचा आणि कामे झाल्यावर मित्रपक्षांना डावलायचे, असा घणाघाती आरोप करत कतारी यांनी काँग्रेस व स्थानिक नेतृत्वाला धारेवर धरले असून “इथून पुढे आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत,” असा थेट आणि आक्रमक इशारा दिला आहे.
अमर कतारी यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. “राज्यात आणि संगमनेरमध्ये महाविकास आघाडी आहे. नगरपरिषदेची निवडणूकदेखील आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो. त्यावेळी शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत उभा होता. मग विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याला ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला का बोलावले गेले नाही ? आमचा उपयोग फक्त आंदोलने करण्यासाठी आणि गर्दी जमवण्यासाठीच करायचा का ?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेस आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना कतारी म्हणाले, “निवडणुकीच्या काळात मतदानासाठी आणि मदतीसाठी १० वेळेस फोन केले जातात. मात्र, निवडणूक जिंकून आल्यावर सत्ताधारी मित्रपक्षांना पूर्णपणे विसरून जातात. हीच का तुमची महाविकास आघाडी धर्म पाळण्याची पद्धत ?” माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहानुभूतीच्या लाटेवर पालिकेची निवडणूक जिंकली म्हणजे सर्व काही मिळाले असा भ्रम सत्ताधाऱ्यांनी बाळगू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या या ‘एककल्ली’ कारभारामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये असंतोष पसरला आहे. “संगमनेरमध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की नाही ? आणि जर असेल, तर ती केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे का ? हे काँग्रेस आणि स्थानिक नेत्यांनी एकदाचे स्पष्ट करून टाकावे. जर आम्हाला डावलले जाणार असेल, तर शिवसेना (UBT) म्हणून आम्हालाही आगामी काळात सर्व राजकीय पर्याय खुले आहेत,” असा इशारा कतारी यांनी दिला आहे.
तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील ही दरी आता अधिक रुंदावणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
