संगमनेर काँग्रेसमध्ये ‘काड्यां’चे राजकारण चव्हाट्यावर !

मुंबईतील आमदार निवासातील भेटीवरून सोशल मीडियावर वादंग

विशेष प्रतिनिधी –

संगमनेर काँग्रेस पक्षांतर्गत अंतर्गत कलह आणि गटबाजी पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. मुंबई येथील आमदार निवासात संगमनेरच्या आमदारांकडे जाऊन काँग्रेसचाच एक पदाधिकारी दीड तास ठाण मांडून बसतो आणि पक्षातीलच नेत्यांविषयी ‘लावालाव्या’ करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतो, अशी खळबळजनक माहिती एका सोशल मीडिया पोस्टद्वारे समोर आली आहे. या व्हायरल पोस्टमुळे संगमनेर काँग्रेसमध्ये ‘काड्या’ करणाऱ्यांचे प्रमाण किती वाढले आहे, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

‘दोन दगडांवर हात ठेवणाऱ्या लाभार्थींचा पर्दाफाश करू !’

व्हायरल पोस्टमध्ये संबंधित पदाधिकाऱ्याचा तीव्र निषेध करण्यात आला असून, “दोन दगडांवर हात ठेवून स्वार्थ साधणाऱ्या अशा लाभार्थ्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे ; योग्य वेळ आल्यावर त्याचा पर्दाफाश केला जाईल,” असा थेट इशाराच देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाच्या राजकीय भूमिकेबाबत नेहमीच साशंकता व्यक्त केली जाते. निवडणुकीच्या काळात सोयीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस अधिकाऱ्यांची अनेक कार्यकर्त्यांची पक्षावरील निष्ठा नेमकी किती उरली आहे, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे एका विशिष्ट पक्षासोबत काँग्रेसची झालेली फरपट आणि त्यामुळे स्वतःचे अस्तित्व धोक्यात आणल्याची टीका आजही राजकीय वर्तुळात होत आहे. निवडणुकांमध्ये काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते इतर पक्षांच्या प्रचारात उघडपणे सहभागी होतात आणि आपण काँग्रेसचे आहोत हे सोयीस्कररित्या विसरतात, असा गंभीर आरोपही केला जात आहे.

आंदोलनांची ‘शोबाजी’: 

संगमनेर काँग्रेसकडून केली जाणारी आंदोलने आणि प्रशासनाला दिली जाणारी निवेदने ही केवळ ‘शोबाजी’ पुरतीच मर्यादित असल्याची टीका नागरिक व कार्यकर्त्यांमधून होत आहे. निष्ठावंतांची गळचेपी आणि पदाधिकाऱ्यांची पुनरावृत्ती होत असल्याचे देखील बोलले जाते. पक्षात तेच तेच चेहरे आणि ठराविक पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा पुन्हा संधी देऊन त्यांना झुकते माप दिले जात आहे. या उलट, वर्षानुवर्षे पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या निष्ठावंतांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याने पक्षात अंतर्गत धुस्पूस नेहमीच सुरू असते. काही दिवसांपूर्वीच नाराज कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन पक्षातील ‘गुढघ्याला बाशिंग’ बांधलेल्या नेत्यांविरोधात आणि अंतर्गत काड्या करणाऱ्यांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला होता.

निष्ठावंतांवर होणारा अन्याय आणि मुंबईपर्यंत जाऊन चालणारे हे कूटराजकारण यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात काय ठोस कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरील एका बातमीने पक्षातील काही ठराविक लोकांच्या ‘बुडाखाली आग’ लागली असली, तरी अशा आदळआपट करणाऱ्यांच्याच निष्ठेची आधी चौकशी व्हावी, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!