संगमनेर पोलिसांची अमली पदार्थविरोधी कारवाई : गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी की स्वतःच्या लाभासाठी ? 

पोलीस अधीक्षकांनी अशा सर्व गुन्ह्यांच्या तपासाची सखोल चौकशी करावी 

विशेष प्रतिनिधी –

संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरोधात होणाऱ्या कारवाया नक्की गुन्हेगारीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी आहेत, की खाकी वर्दीच्या आर्थिक लाभासाठी ? असा जळजळीत प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे. पोलीस कारवाईचा भपका दाखवून छापलेले फोटो आणि लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे दावे, यामागे तपासाच्या नावाखाली मोठे ‘गोडबंगाल’ शिजत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांत संगमनेर शहर व ग्रामीण भागात गांजा, गर्द आणि ड्रग्जवर मोठ्या कारवाया झाल्या. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला, अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या. परंतु, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना तपासात अशा काही ‘सोयीस्कर’ त्रुटी सोडल्या जातात, ज्यामुळे सराईत गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो. कायदा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरला नसल्याने, जामिनावर बाहेर आलेले तेच तेच गुन्हेगार पुन्हा उघडपणे अमली पदार्थांची विक्री करताना आढळतात.

शहरातील वाढत्या नशाखोरीमुळे तरुण पिढी बरबाद होत असताना, तपास अधिकारी मात्र आरोपींशी ‘सेटलमेंट’ करण्यात मग्न असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एकाच तपास अधिकाऱ्याकडे अमली पदार्थांचे सर्व गुन्हे वारंवार का सोपवले जातात ? मूळ पुरवठादार किंवा टोळीच्या मुळाशी न पोहोचता केवळ स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई दाखवून तपास गुंडाळला जातो.

“आरोपींसोबत फोटो छापून प्रसिद्धी मिळवणे म्हणजे गुन्हेगारी संपवणे नव्हे,” असे बोलले जात असून कारवाईनंतर आरोपींना खरोखरच शिक्षा झाली का, की खाबुगिरी करून त्यांना मोकाट सोडले गेले, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

तालुक्यातील नशाखोरी समूळ नष्ट करायची असेल, तर संशयास्पद भूमिका घेणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!