संगमनेरचा कोट्यवधींचा एसटीपी प्लांट व भुयारी गटार प्रकल्प रखडला ; प्रसिद्धीच्या गदारोळात मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष !

दोन्ही आमदारांचे सोयीस्कर मौन..

विशेष प्रतिनिधी : 

संगमनेर शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या प्रवरा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाचा मानला गेलेला एसटीपी प्लांट आणि भुयारी गटार प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी असलेल्या या प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती काय आहे, प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब का होत आहे आणि त्याचा नागरिकांवर नेमका काय परिणाम होत आहे, याबाबत आता स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, संगमनेर शहर आणि तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्याकडून विविध विकासकामांचा पाठपुरावा होत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याचवेळी शहराच्या मूलभूत गरजांशी संबंधित असलेल्या एसटीपी आणि भुयारी गटार प्रकल्पाबाबत दोन्ही आमदारांनी सोयीस्कर रित्या मौन बाळगल्याचा आरोप होत आहे.

विकासकामे, कार्यक्रम आणि प्रसिद्धीपत्रकांच्या माध्यमातून विविध कामांची माहिती नागरिकांपर्यंत हो सविण्याचा धुमाकूळ सुरू असताना, शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि प्रवरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही तितक्याच गांभीर्याने हाताळला जावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. विकासाची खरी परिणामकारकता केवळ घोषणांमध्ये नव्हे, तर शहरातील मूलभूत सुविधा प्रत्यक्षात कितपत सुधारल्या यावर ठरते.

भुयारी गटार योजनेअंतर्गत शहरातील उपनगरातील काही भागांत रस्ते खोदण्यात आले असून, काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने नागरिकांना खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. मुख्य वाहिन्या, उपवाहिन्या आणि घरगुती जोडण्यांचे काम कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती पालिका प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

एसटीपी प्रकल्पाचा उद्देश शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीवरील प्रदूषणाचा भार कमी करणे हा आहे. मात्र, भुयारी गटाराचे जाळे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले नसल्यास एसटीपीचा अपेक्षित वापर होण्यास अडचणी येऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे एसटीपी प्लांटची सद्यस्थितीची अधिकृत माहिती पालिकेने नागरिकांसमोर मांडणे गरजेचे आहे.

शहरातील प्रक्रिया न झालेले सांडपाणी प्रवरा नदीत मिसळत असल्याच्या तक्रारी आणि आरोप नागरिकांकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्याची गुणवत्ता, सांडपाण्याची सद्यस्थिती आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती सार्वजनिक करण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रवरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पर्यावरणापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या आरोग्याशीही संबंधित असल्याने प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एसटीपी प्लांटच्या प्रस्तावित जागेबाबत जोर्वे नाका परिसरातील काही नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. तांत्रिक तपासणी करून नागरिकांना योग्य माहिती देणे आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक आहे. स्थानिकांचा विश्वास संपादन करूनच प्रकल्प पुढे नेल्यास विरोधाची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते. प्रकल्पाबाबत कोणतीही स्थगिती किंवा कायदेशीर अडचण असल्यास त्याची अधिकृत माहितीही पालिकेने स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. कंत्राटदाराच्या देयकांचा प्रश्न असल्यास तोही स्पष्ट व्हावा

संगमनेरच्या विकासासाठी आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ दोघेही अगदी तुटून पडले आहेत. त्यांच्याकडून विविध प्रश्नांवर पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शहराच्या सांडपाणी व्यवस्थेशी संबंधित या महत्त्वाच्या प्रकल्पावरही दोन्ही आमदारांनी स्पष्ट भूमिका जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. हा प्रकल्प हलवून इतर ठिकाणी सुरू करण्यासाठी जागा मिळवून देण्याचे ज्यांनी कोणी बोलबच्चन केले आहे त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.

विकासकामांच्या प्रसिद्धीबरोबरच रखडलेल्या प्रकल्पांचा आढावाही सार्वजनिक झाला, तर जनतेच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळू शकतील. या प्रकल्पासाठी किती निधी मंजूर झाला, किती खर्च झाला, किती काम पूर्ण झाले, किती काम बाकी आहे, एसटीपीची सद्यस्थिती काय आहे, किती घरगुती जोडण्या पूर्ण झाल्या आहेत आणि प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत कोणती, प्रकल्प रखडल्याने किती आर्थिक नुकसान होणार आहे, किती आर्थिक बोजा पडणार आहे, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!