बनावट विदेशी दारूच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
१ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर प्रतिनिधी –
स्थानिक गुन्हे शाखेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत बनावट लेबल लावलेल्या विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, आरोपीसह एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोये तसेच पोलीस अंमलदार संदिप पवार, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर आणि सुनिता पवार यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी रवाना झाले होते.

३ सप्टेंबर २०२६ रोजी पथक भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, भिंगार येथील विजय कौशीक याने बनावट लेबल लावलेली दारू बाराबाभळी येथील महेशनगरमधील आलिशा मंझीलच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत ठेवली असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता विजय बलेश्वरसिंह कौशीक (वय ४६, रा. प्लॉट नं. ५, विजयनगर, भिंगार, अहिल्यानगर) हा आढळून आला. त्याच्याकडे घराबाबत चौकशी केली असता त्याने सदर घर भाड्याने घेतल्याचे सांगितले.
पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता LIGHTHOUSE Extra Smooth WHISKY कंपनीच्या ७५० मिली क्षमतेच्या १७५ बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांवरील लेबलवर किंमत, बॅच क्रमांक आणि उत्पादनाची तारीख आढळून आली नाही. त्यामुळे बाटल्यांवर बनावट लेबल लावण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी विजय कौशीक याला ताब्यात घेतले.

या कारवाईत १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या १७५ दारूच्या बाटल्या आणि २० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमालाबाबत आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, सदर मुद्देमाल त्याने त्याचा साथीदार संदिप सानप (रा. मेहकरी, ता. अहिल्यानगर) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. संदिप सानप हा सध्या फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी विजय बलेश्वरसिंह कौशीक याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२), ३४१(२), ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ब), (ई), (फ), ६६, ८०, ८१, ८३, ९०, १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
