संगमनेरमध्ये महसूल पथकाची धडक कारवाई ; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळूसाठा जप्त
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महसूल व गौण खनिज भरारी पथकाने केलेल्या एका धडक कारवाईत प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे उत्खनन करून साठवून ठेवलेला सुमारे २० ब्रास विनापरवाना ओली वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मौजे निमज येथील विद्यानगर ते साकुरी वस्ती रस्त्याच्या पूर्व बाजूला, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या फॉरेस्ट गट नं. ३९ मधील प्रवरा नदीपात्रात हा वाळूसाठा लपवून ठेवण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. घटनास्थळी पाहणी केली असता कोणतीही व्यक्ती आढळून आली नाही. स्थानिक चौकशी केली असता, हा वाळूसाठा चैतन्य उर्फ चेतन सूर्यभान साकुरे (रा. निमज, ता. संगमनेर) याने केल्याचे निष्पन्न झाले.

सुमारे १२,००० रुपये किमतीचा २० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने जप्त करण्यात आलेला हा साठा पोलीस पाटील निलेश सोनु साळुंखे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
तहसीलदार संगमनेर यांच्या आदेशानुसार या गौण खनिज भरारी पथकात खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर), विश्वजित चौघुले (मंडळ अधिकारी, संगमनेर खुर्द), अमृत अहीरे (मंडळ अधिकारी, पिंपरणे), संदीप पवार (ग्राम महसूल अधिकारी, घारगाव), प्रशांत फटांगरे (ग्राम महसूल अधिकारी, निमज)
तक्रारदार म्हणून मंडळ अधिकारी धोंडीबा बुधा भालचिम (वय ५७) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
वाळू वाहतुकीचा व उत्खननाचा कोणताही परवाना नसताना नदीपात्रातून अवैध वाळूची चोरी करून साठा केल्याप्रकरणी आरोपी चैतन्य उर्फ चेतन सूर्यभान साकुरे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

