खांडगाव शिवारात विनापरवाना वाळूसाठा जप्त ; गुन्हा दाखल

तहसीलदार धीरज मांजरे यांचा छापा

संगमनेर (प्रतिनिधी) :

संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात प्रवरा नदीपात्रातून अनधिकृतपणे उत्खनन करून विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला ६ लाख रुपये किमतीचा १०० ब्रास वाळूसाठा महसूल व पोलीस पथकाने धाड टाकून जप्त केला आहे. याप्रकरणी मंगेष बाबु केदारी (रा. खांडगाव, संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिपरणे महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी अमृत रामदास हिले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तहसीलदार धिरज मांजरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, खांडगाव येथील खांडगाव फाटा ते खांडेश्वर मंदिर रोडच्या आतील उजव्या बाजूस एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा साठा करून ठेवण्यात आला आहे.

त्यानुसार, तहसीलदार संगमनेर यांच्या आदेशावरून भरारी गौण खनिज पथकाने सरकारी वाहनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारवाईसाठी खांडगावचे पोलीस पाटील निलेश सोनू साळोखे यांना पंच म्हणून बोलावण्यात आले आणि त्यांच्या समक्ष पंचानामा करण्यात आला.

पाहणी दरम्यान संशयित आरोपी मंगेष बाबु केदारी याच्या मालकीच्या जमिनीवर कोणतीही शासकीय पूर्वपरवानगी नसताना सुमारे ६ लाख रुपये किमतीचा १०० ब्रास वाळूचा साठा मिळून आला. याबाबत विचारणा केली असता, आरोपीला वाळू वाहतुकीच्या कोणत्याही अधिकृत पावत्या किंवा कागदपत्रे सादर करता आली नाहीत. ही वाळू घराच्या बांधकामासाठी आणल्याचे सांगण्यात आले, परंतु बांधकामाबाबतची कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा कागदपत्रे दाखवता आली नाहीत. ही वाळू प्रवरा नदीपात्रातून अनधिकृतपणे उत्खनन करून साठवल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळी तहसीलदार संगमनेर, मंडळ अधिकारी संगमनेर खुर्द, मंडळ अधिकारी पिपरणे आणि घारगावचे ग्राममहसूल अधिकारी एस. एस. पवार यांनी सविस्तर पंचानामा करून जप्त केलेला वाळूसाठा गावचे पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिला.

मंडळ अधिकारी अमृत रामदास हिले यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मंगेष बाबु केदारी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम ३०३(२), ३१७(२), ३१७(५), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३, १५ तसेच खान व खनिजे विकास अधिनियम १९५७ चे कलम ४(A1), २१ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक भिवजी पारधी हे करत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!