जोर्वे गावात कृषीदूतांचे उत्साहात स्वागत ; आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आता थेट शेताच्या बांधावर !

थोरात कृषी महाविद्यालयाचा उपक्रम…

संगमनेर (प्रतिनिधी) : 

ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव (RAWE) २०२६-२७ या उपक्रमांतर्गत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात आगमन झाले. यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कृषीदूतांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आता थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार असून जोर्वे गावातील शेतीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्वागत समारंभाप्रसंगी जोर्वे गावच्या सरपंच प्रीती गोकुळ दिघे, उपसरपंच बादशाह बोरकर, सहाय्यक कृषी अधिकारी अर्चना नवले यांच्यासह गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषीदूतांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवाचा गावातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

सहा कृषीदूतांचा काही महिने गावात मुक्काम

या उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी साहिल लहांगे, चैतन्य नवले, करण पटारे, प्रदीप रंधे, मोहित शिंदे आणि रोहित यादव हे सहा कृषीदूत पुढील काही महिने जोर्वे गावात मुक्कामी राहणार आहेत. या कालावधीत ते गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेणार आहेत.

आधुनिक शेती तंत्रज्ञान, विविध कृषीविषयक प्रात्यक्षिके, डिजिटल शेती (Digital Farming), पीक व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध कृषी कल्याणकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन दिली जाणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतात काम करून शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींची माहिती देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या माध्यमातून गावात कृषीविषयक जनजागृती वाढण्यासोबतच शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. परिणामी शेती अधिक आधुनिक, ज्ञानाधिष्ठित आणि उत्पादनक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमाची अंमलबजावणी

सदर ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या सचिव सौ. शरयूताई देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर, शैक्षणिक प्रमुख प्रा. रविंद्र दसपुते, ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन या कृषीदूतांना लाभणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान आणि शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड घालणारा हा उपक्रम जोर्वे गावातील कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून आधुनिक शेतीच्या दिशेने टाकलेले हे एक आश्वासक पाऊल मानले जात आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!