माणसांची जिरवाजिरवी नव्हे, जमिनीत पाणी जिरवणे महत्त्वाचे : आमदार अमोल खताळ

मागील काळात फक्त जिरवाजिरवी राजकारण 

संगमनेर (प्रतिनिधी) :

“मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण झाले; मात्र आपण माणसांची जिरवाजिरवी करण्याऐवजी जमिनीत पाणी जिरविण्याला प्राधान्य देत आहोत,” असा जोरदार टोला आमदार अमोल खताळ पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ तसेच जगदंबामाता मंदिर सभामंडपासह सुमारे १ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

विरोधकांच्या जुन्या जिरवाजिरवीच्या राजकारणावर ताशेरे ओढत आमदार खताळांनी विकासाचा नवा दृष्टिकोन मांडला. तालुक्यात जलसंधारणाची कामे हाती घेऊन गावोगावी बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरण करून पाणीसाठा वाढविणार असल्याचा विश्वास दिला. निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे परिसरातील पाणीटंचाई कमी होण्यास मोठी मदत होईल, असे स्पष्ट केले.

देवकौठे येथे १ कोटी ६ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्वसामान्य जनतेचे पाठबळ पाठीशी असेपर्यंत कुणाचीही भीती वाटत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुष्काळी परिस्थितीमुळे सत्कार स्वीकारणे टाळत असल्याचे सांगत, यावेळी केवळ गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष आग्रहास्तव आणि त्यांच्या हस्तेच सत्कार स्वीकारत असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिवसेना शाखाप्रमुख सुनील मुंगसे यांनी केले, सूत्रसंचालन अभियंता गणेश कहांडळ यांनी केले तर आभार अभिमन्यू मुंगसे यांनी मानले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!