ढोलकीच्या थापेवर लोककलेचा सन्मान ; पवळा भालेराव हिवरगावकर स्मृती लोककला महोत्सवासाठी ६ लाखांचा निधी मंजूर !

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

संगमनेर / प्रतिनिधी :

ढोलकीचा कडकडाट, घुंगरांचा नाद आणि लावणी-वगाच्या अदाकारीने महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करणाऱ्या संगमनेरच्या मातीत आता पुन्हा एकदा लोककलेचा जागर रंगणार आहे. हिवरगाव पावसा येथील पहिल्या महिला तमाशा कलावंत स्व. पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या लोककला महोत्सवासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निमित्ताने मोठे यश आले असून, लवकरच हिवरगाव पावसा येथे हा सोहळा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम दिमाखात पार पडणार आहे.

संगमनेर परिसराला तमाशा आणि लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचे स्मरण राहावे, त्यांच्या कलेचा यथोचित गौरव व्हावा आणि नव्या पिढीला या अस्सल मराठमोळ्या लोककलेची ओळख व्हावी, या उद्देशाने आमदार खताळ यांनी मागील वर्षापासून तालुक्यातील ज्येष्ठ तमाशा कलावंतांच्या नावाने पुरस्कार देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षी ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने वाई तालुक्यातील ज्येष्ठ कलावंत आवळे मास्तर यांना सन्मानित करण्यात आले होते.

पवळा भालेराव यांच्या नावाने यंदाचा पुरस्कार

यंदा हा मानाचा पुरस्कार हिवरगाव पावसा येथील स्व. पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या नावाने प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या स्मरणार्थ भव्य लोककला महोत्सवाचे आयोजन करण्याची घोषणा आ. खताळ यांनी यापूर्वीच हिवरगाव पावसा येथील एका कार्यक्रमात केली होती. या महोत्सवाच्या माध्यमातून लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्याबरोबरच लोप पावत चाललेल्या पारंपरिक कलांचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.

या महोत्सवासाठी अंदाजे ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. खताळ यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून निधीची तरतूद करण्याची विनंती केली. आ. खताळ यांच्या पाठपुराव्याची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत यांनी महोत्सवाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देत ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महोत्सव व पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याने कलाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

“संगमनेर तालुक्याला लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांचे स्मरण आणि सन्मान व्हावा, या उद्देशाने स्व. पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ लोककला महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठपुरावा केला होता. विभागाने सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येईल.”

अमोल खताळ, आमदार

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!