अमृतवाहिनी बँक शेतकरी व युवकांच्या प्रगतीचा भक्कम आधार : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

“इगतपुरी आणि या परिसराशी आपला जुना ऋणानुबंध आहे. एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दररोज आरोग्य सेवा मिळत असून हे या विभागातील महत्त्वाचे केंद्र बनले आहे. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदराच्या महामार्गामुळे साकूर परिसराची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढून हा भाग विकासाचे नवे केंद्र ठरणार आहे. अशा काळात अमृतवाहिनी सहकारी बँकेची ही नवी शाखा येथील शेतकरी, नवउद्योजक आणि युवकांच्या आर्थिक प्रगतीसाठी नक्कीच मोठा आधार ठरेल,” असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

साकूर फाटा (ता. इगतपुरी) येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या १४ व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार शिवराम झोले, नारायण शेठ वाजे, निवृत्ती जाधव, पांडुरंग घुले, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांच्यासह उत्तमराव सहाने, के. के. थोरात, कचरू डुकरे, उत्तमराव झनकर, नंदू गाढवे, सुनील सहाने, बाळासाहेब कुकडे, मिलिंद कुकडे, आत्माराम फोकणे, रंगनाथ भगत, माणिकराव फोकणे, दशरथ वर्पे, विष्णुपंत रहाटळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातून अनेक रुग्ण उपचारांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये येतात. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर चालणाऱ्या अमृतवाहिनी बँकेने सर्वसामान्य नागरिक, ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास संपादन केला आहे. चांगला हेतू ठेवून काम केल्यास यश नक्की मिळते. या विभागाचे रूप आता बदलत असून, प्रत्येक नागरिकाने या नव्या बदलांसोबत आपली प्रगती साधावी.”

संगमनेरचा सहकार देशाला दिशादर्शक : खा. राजाभाऊ वाजे

खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वांवर उभा राहिलेला संगमनेरचा सहकार संपूर्ण देशाला दिशादर्शक आहे. एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी या विभागाच्या आरोग्याची मोठी काळजी घेतली आहे. सध्या सहकार क्षेत्र अडचणीत असले, तरी सक्षम नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत आहे. या भागाच्या विकासात अमृतवाहिनी बँकेचा मोठा उपयोग होईल.”

सहकार क्षेत्राला बळकटी देण्याची गरज : डॉ. सुधीर तांबे

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले की, “संगमनेर आणि या परिसराचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य देत लोकसेवेचे मोठे केंद्र उभे राहिले आहे. खाजगी क्षेत्राकडून होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी सहकार क्षेत्र कार्यरत असून, या चळवळीला अधिक बळकटी देणे काळाची गरज आहे.”
बँकेची १,२५० कोटींची उलाढाल : डिजिटल प्रणाली आणि मोबाईल बँकिंगसारख्या अत्याधुनिक सुविधांच्या जोरावर अमृतवाहिनी बँकेने राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार पटकावले असून, बँकेची एकूण उलाढाल सुमारे १,२५० कोटी रुपयांवर पोहोचली असल्याची माहिती चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली.

या सोहळ्याला संचालक किसन सुपेकर, लक्ष्मण खेमनर, शिवाजी जगताप, किसनराव वाळके, अण्णासाहेब शिंदे, विवेक तांबे, राजू गुंजाळ, मोहन करंजकर यांच्यासह साकूर व परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर संचालक राजू गुंजाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!