जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेची एन्ट्री
संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात
संगमनेर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, शिवसेनेनेही निवडणुकीत उमेदवार उतरवले आहेत. संगमनेर तालुक्यातून शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अर्ज दाखल करण्यात आले. शेती सहकारी संस्था मतदारसंघातून निमज येथील बादशाह दत्तू गुंजाळ, शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघातून मंगळापूर येथील शंकर मारुती वाळे, तर अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून पंढरीनाथ माधव इल्हे यांनी अर्ज दाखल केले.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय गटांकडून प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
