संगमनेर तालुक्यात सात ठिकाणी अद्ययावत एस.टी. प्रवासी थांबे उभारणार !

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश ; जिल्ह्यातील ७५ थांब्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. तालुक्यातील लोहारे, निळवंडे, मांची फाटा, वडगाव पान, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द आणि वरवंडी फाटा या सात ठिकाणी अद्ययावत एस.टी. प्रवासी थांबे उभारण्यात येणार आहेत. या मागणीसाठी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे अशी माहिती प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

संगमनेरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ७५ अद्ययावत प्रवासी थांबे उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एस.टी. प्रवाशांना लवकरच अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर एस.टी. बसने प्रवास करतो. मात्र, अनेक ठिकाणी बस थांब्यांवर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना ऊन, वारा आणि पावसाचा सामना करावा लागतो. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होते.

ही बाब लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी अद्ययावत प्रवासी थांबे उभारण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत संबंधित सात ठिकाणांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण ७५ प्रवासी थांब्यांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची प्रतीक्षा करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळणार आहेत. संगमनेर तालुक्यातील सात गावांचा या सुविधेत समावेश झाल्याने संबंधित गावांमधील नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार व्यक्त केले आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!