संगमनेर तालुक्यात १०२ कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती

संगमनेर : प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील विविध विकासकामांना चालना देण्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
चिंचोली गुरव येथे सुमारे ४ कोटी ४७ लाख रुपये खर्चाच्या उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या योजनेमुळे परिसरातील शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
समनापूर येथील गणपती मंदिर परिसरात संगमनेर ते वडगाव पान फाटा, निळवंडे ते कौठे कमळेश्वर राष्ट्रीय महामार्ग (जांभूळवाडी फाटा) या मार्गावरील सुमारे ९७ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या रस्ते सुधारणा कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

याशिवाय संगमनेर नगरपरिषद हद्दीतील साईनगर येथील म्हाळुंगी नदीवरील पुलाला ‘स्व. खासदार बाळासाहेब विखे साईसेतू’ या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. गंगामाई घाटावर सुमारे ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हिंदू दशक्रिया विधी घाटाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
तसेच श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर येथील सुमारे ३० लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.


