स्वच्छ, सुंदर अन् धुळमुक्त संगमनेरच्या दिशेने मोठे पाऊल !

‘आदर्श संगमनेर’ची संकल्पना पूर्णत्वाकडे – माजी मंत्री थोरात…

विरोधकांच्या बुद्धीची कीव येते – आमदार सत्यजित तांबे

संगमनेर प्रतिनिधी : 

स्वच्छ, सुंदर आणि धुळमुक्त संगमनेर शहराच्या संकल्पनेला अधिक गती देण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेने सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची अत्याधुनिक स्वच्छता वाहने सेवेत दाखल केली आहेत. दोन स्वीपिंग मशीन, दहा नवीन घंटागाड्या, जुन्या पाच घंटागाड्यांचे नूतनीकरण, चार ट्रॅक्टर आणि दोन अन्य वाहनांचे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर लोकार्पण करण्यात आले. या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आदर्श स्वच्छ व सुंदर संगमनेरची संकल्पना पूर्णत्वाकडे जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने ‘एक पणती स्वच्छतेची’ या अभियानांतर्गत यशोधन कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, डॉ. संजय मालपाणी, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर हे विकसित आणि वैभवशाली शहर असून नागरिकांना चांगल्या व आधुनिक सुविधा देण्याबरोबरच स्वच्छतेची संस्कृती निर्माण करण्याचे काम शहरात झाले आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून नगरपालिकेच्या आदर्शवत कामाची परंपरा सुरू झाली. त्यानंतर सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा पुढे नेली. दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले.

नवीन अत्याधुनिक वाहनांमुळे शहरातील रस्त्यांची स्वच्छता अधिक प्रभावीपणे करता येणार असून धुळमुक्त संगमनेरच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शहरात मूलभूत सुविधा चांगल्या असून पाणीपुरवठाही मुबलक आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. सार्वजनिक स्वच्छता ही केवळ नगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पाच वर्षे स्वीपिंग मशीनची देखभाल सरकारकडून

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, मागील नऊ महिन्यांपासून नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता आणि शहर विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘स्वच्छ भारत मिशन २.०’ अंतर्गत स्वच्छतेच्या कामाला गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांच्या सहकार्याने राज्यातून संगमनेर नगरपालिकेला प्रथमच अडीच कोटी रुपये किमतीचे स्वीपिंग मशीन उपलब्ध झाले आहे. या मशीनच्या देखभालीची पुढील पाच वर्षांची जबाबदारी सरकारकडे असणार आहे.

स्वच्छतेच्या कामासाठी नव्याने कोणार्क कंपनीला ठेका देण्यात आला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी पाहिलेले स्वच्छ, सुंदर संगमनेरचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेचा पैसा वाचवून विविध माध्यमांतून विकासासाठी निधी मिळविण्याचे काम केले जात आहे. शहरात नवीन भाजी मार्केट सुरू झाले असून नऊ ठिकाणी फूड कोर्ट उभारण्यात आले आहेत. आगामी काळात शून्य टक्के कचरा निर्मितीचे उद्दिष्ट आणि सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीजबिल शून्यावर आणण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एका दिवसात ४० किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, नव्याने दाखल झालेल्या स्वीपिंग मशीनच्या माध्यमातून एका दिवसात सुमारे ४० किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करता येणार आहे. त्यामुळे संगमनेरच्या स्वच्छ शहर या ओळखीला अधिक बळ मिळेल. या अभियानात विद्यार्थ्यांनीही स्वच्छतादूत म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर आणि गार्डन सिटी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सवय नागरिकांमध्ये रुजवली. या कामाची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रपतींकडून दहा कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले, तसेच अमिताभ बच्चन यांच्या हस्तेही सन्मान झाला. शहरात नव्याने ३७ उद्याने विकसित करण्यात आली. या सर्व कामांमध्ये सफाई कर्मचारी आणि नागरिकांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की, बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सुमारे पाच कोटी रुपयांची वाहने स्वच्छतेच्या कामासाठी उपलब्ध झाली असून पहाटेपासून स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करतात. या कामात नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा.

कार्यक्रमास सभापती किशोर टोकसे, सौरभ कासार, शैलेश कलंत्री, किशोर पवार, डॉ. दानिश पठाण, गणेश गुंजाळ, मुजीब खान पठाण, अमजद खान पठाण, भारत बोऱ्हाडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, महिला, युवक आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी केले, तर उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख यांनी आभार मानले.

किशोर टोकसे हे उत्कृष्ट आरोग्य सभापती – आमदार तांबे 

संगमनेर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे विद्यमान सभापती किशोर टोकसे यांच्या कार्याची प्रशंसा करताना आमदार तांबे म्हणाले की, चार टर्म नगरसेवक पदी निवडून आलेला हा माणूस सातत्याने उत्साहाने काम करत असतो. प्रत्येक वेळी पहिल्यांदाच निवडून आलो आहोत असे समजून काम करतो. आजच्या कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग आहे. आरोग्य सभापती म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. पुन्हा तेच आरोग्य सभापती असावेत अशी नगरसेवकांची इच्छा आहे. असे सांगत आमदार तांबे यांनी टोकसे यांचे कौतुक केले.

विरोधकांच्या बुद्धीची कीव येते – आमदार सत्यजित तांबे

संगमनेर शहर धुळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने राज्यातून केवळ संगमनेर नगरपालिकेला अडीच कोटी रुपये किमतीचे स्वीपिंग मशीन उपलब्ध झाले. या मशीनसाठी निधी कसा मिळाला, याची माहिती विरोधकांना नाही. मशीन दाखल झाल्यानंतर विरोधकांना जाग आली. आम्ही जनतेसाठी काम करतो, त्यामुळे फुकटच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविणाऱ्या विरोधकांच्या भूमिकेची कीव येते. निधी कसा आणायचा आणि चांगली विकासकामे कशी करायची, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!