‘एक पणती स्वच्छतेची’ संगमनेरमध्ये स्वच्छतेचा जागर ; आज (बुधवार) यशोधन कार्यालयातून जनजागृती रॅली

संगमनेर प्रतिनिधी –

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने आज बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी ‘एक पणती स्वच्छतेची’ या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता यशोधन कार्यालय येथून या अभियानाला सुरुवात होणार असून, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेने शहरातील नागरी सुविधांसोबतच स्वच्छतेच्या क्षेत्रातही विविध उपक्रम राबवले आहेत. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांनी संगमनेर नगरपरिषदेचा गौरव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

संगमनेर शहराच्या भविष्यातील विकासाबाबत माहिती देताना नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की, शहरात पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांना दर्जेदार सुविधा आणि शाश्वत विकासाच्या विविध योजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे. स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून संगमनेर शहराला ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ नेण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे.

दीपावलीच्या मंगलमय पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या ‘एक पणती स्वच्छतेची’ या अभियानातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शुभारंभप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सर्व सभापती, नगरसेवक-नगरसेविका, माजी नगराध्यक्ष, व्यापारी, विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्वच्छ आणि सुंदर संगमनेरच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, या जनजागृती रॅलीत शहरातील महिला, युवक आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे तसेच नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!